भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुले गांवींचें न देखेसें जालें । परदेसी एकलें किती कंठूं

apule ganvinchen na dekhesen jalen | paradesi ekalen kiti kanthun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुले गांवींचें न देखेसें जालें । परदेसी एकलें किती कंठूं ॥१॥ म्हणऊनि पाहें मूळ येतां वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥ध्रु.॥ पाहातां अवघ्या दिसतील दिशा । सकळ ही वोसा दृष्टीपुढें ॥२॥ तुका म्हणे कोणी न सांगे वारता । तुझी वाटे चिंता पांडुरंगा ॥३॥