भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंध पंगु दॄढ जालों मायापडळभ्रांती

andh pangu drudh jalon mayapadalabhranti

अंध पंगु दॄढ जालों मायापडळभ्रांती । कर चरण विव्हळ गेले तंव भेटलें निवृत्ती । ज्ञान मज उपदेशिलें नेलें अज्ञानक्षिती । वृक्ष एक तेथें होता त्या तळीं बैसविलें रीती ॥१॥ धर्म जागो निवृत्तीचा हरिनामें उत्सावो । कर्म धर्म लोपले माझें फ़िटला संदेहो । धर्म अर्थ काम पूर्ण दान मान समूह । नेघे मी इंद्रियवृत्ति रामकृष्णनामीं टाहो ॥२॥ कल्पना मावळली कल्पवृक्षाचे तळवटीं । चिंता हें हरपली माझी नित्य अमृताची वाटी । मन हें निमग्न झालें नित्य वसे वैकुंठी । तापत्रयें ताप गेलें नाना दोषाचे थाटी ॥३॥ अनंत हें मायामय लोपल्या जिवाचिया साठी । हरपल्या योनीमाळा चिंतामणीकसवटी । सिध्दि बुध्दि समरसल्या जीवशिव एकदाटी । आत्माराम मन जालें एकतत्त्व शेवटीं ॥४॥ आत्माराम निर्गमलें वेदशास्त्रगुह्य ज्ञानें । वासनेचि मोहजाळी ते विराली नाना स्थाने । फुटलें नाना घट तुटलीं नाना बंधनें । सुटल्या जीवग्रंथी ऐसें केलें त्या गुरुज्ञानें ॥५॥ मा मोक्ष हे ठेले मागें मुक्तिमार्ग निमला । वृत्ति हे बुडाली माझी निवृत्ति गळाळा पाजीला । सत्रावी वोळली बाळा आत्माराम दाता जाला ॥६॥ बुध्दि बोध संवगडे साजीव करचरण । नयनीं नयन जाले चक्षु मी समाधान । दिव्य देह अमृत कळा दशदिशा परिधान । सर्व हें ब्रह्म फ़ळद फ़ळलें विज्ञान ॥७॥ निवृत्ति गुरु माझा अंधपण फ़ेडिलें ॥ सर्वत्र दृष्टी जाली परतत्त्वीं राहिलों । निरसली माया मोहो श्रीराम अंजन लेईलों । ज्ञानदेवो ज्ञानगंगे निवृत्तिनें बुडविलों ॥८॥