भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदि आत्मा जोतिलिंगा लांबियेला घटु

adi atma jotilinga lambiyela ghatu

आदि आत्मा जोतिलिंगा लांबियेला घटु । स्थाविरिले मायावस्त्र । लिंगावरी प्रविष्ट ॥ तपन नाम ध्वनी । इंद्रिया केलें सपाटु ॥१॥ हळुहळु गळती गळे । गळों लागली सकळें ॥ उच्चारितां कृष्णनाम । भेणें पळिजे कळिकाळें ॥ त्रिगुण सुटल्या गांठी घटु विराला सघन । पंचतत्त्वें एके ठाई आत्मा नांदे परिपूर्ण ॥ जिवशिव हारपले एक दिसे चैतन्य । आत्माराम विदेहिया ॥ श्रीगुरुनें सांगीतली खुण ॥२॥ नरदेह अवचितें । जो साधकु होय नारायण । परमानंदें गळति गळे । पांचहि तत्त्वें हरपोन ॥३॥ निवृत्ति सखा माझा दीनदयाळ श्रीगुरु । आळंकापुरीं स्थापियेलें ॥ दिधला विठ्ठल उच्चारु । समाधि जीवन माझें वरी अजानवृक्षतरु ॥ जोंवरी चंद्रसूर्य तोंवरी कीर्तिघट स्थिरु ॥४॥ गाति वाति साधु मुनी छंद घट मठीं चित्त । विरेल देह बुध्दि ज्ञानदाता देईल उचित ॥ विज्ञानेंसी गोष्टी सांगे ऐसें पद पावत । बापरखुमादेविवरीं लांबविला घटु ज्ञानदेव सांगत ॥५॥