भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनि जाऊनि करी गौळणीचे कोड । पुरवूनि सकलही अंतरींची चाड । नेदी प्रेम त्याचें खंडो करी वाड । ऐसा कृपाळू हा सुखाचा सुरवाड वो

yeuni jauni kari gaulaniche kod | puravuni sakalahi antarinchi chad | nedi prem tyachen khando kari vad | aisa krupalu ha sukhacha suravad vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
येऊनि जाऊनि करी गौळणीचे कोड । पुरवूनि सकलही अंतरींची चाड । नेदी प्रेम त्याचें खंडो करी वाड । ऐसा कृपाळू हा सुखाचा सुरवाड वो ॥१॥ धन्यभाग्याचा त्या जन्मल्या संसारी । ज्यांचे ध्यानी मनीं नित्यकाळ हरी । करीतां काम काज दृष्टी यावरी । बोलतां चालतां जेवितां निरंतरीं वो ॥२॥ त्यांचा विकिला ऐसा रावें त्यांच्या घरीं । पडिलें काम काज तेंहि आपण करी । नवचे पळभरी त्या सांडूनियां दुरी । त्यांची न लाजोचि म्हणवितां कामारी वो ॥३॥ त्यांचा येवजाव सासुरें माहेर । झाला आपणाचि लेणें अलंकार । अवघें धन वित गोत परिचार । झाला नाम रुप दीर भावे वर वो ॥४॥ नेदी उरों त्या आणिक दुसरें । विण आपण वो सोयरे धायरे । गाई म्हशी पशु पोटींची लेंकुरें । झाला घरदार त्यांचे एकसरे वो ॥५॥ खाती जेविती ते भोग सकळही । झाला आपणाचि संचरोनि देहीं । नेदी आपपर ऐसें दिसों कांहीं । निळा म्हणे ऐसी ऐक्याची नवाई वो ॥६॥