भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी

vishvajanamohana kapatiya narayana | kay devapana miravitosi

रचनाकार: संत गोणाई · अभंग
विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी ।।१।। दर्शना आलिया हृदयीं संचरसी। देहभाव घेसी हिरोनियां ।।२।। या विश्वावेगळे नवल तुझें करणें सांगावें गाऱ्हाणे कवणालागीं ||३|| सर्वांगें सुंदर परी हृदयें कठोर। नेणसी जिव्हार मज दुर्बळीचें ||४|| मज अनाथाचें बाळ वेधोनि मोहिलें। बहुत दुःख झालें सांगों कोणा ॥ ५॥ कासया पितृभक्ति पुंडलिकें केली विवसी आणिली पंढरीसी ।।६॥ माय दुखवुनी मोहिसी बाळकें। देवपण निकै कैसें तुझें ।।७॥ यातें अनुसरल्या कैंची बाप माय नाठवेची सोय संसाराची ॥१८॥ ऐसियानें संग धरिला तुझा देवा । प्रत्यक्ष अनुभवा आलें मज ।।९।। आतां माझिया जीवीचें जाणसी तें गुज तरी काई तुज उणें होते ।।१०।। माझा नामा लावीं संसाराचे सोई विनविते गोनाई केशवा ।।११।।