भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेणु वाजवीत यमुनेच्या तटीं । उभा कान्हया सांवळा जगजेठी । भोंवती गोधनें वो थाटीं । एकोनि गवळणी धांवती उठाउठीं वो

venu vajavit yamunechya tatin | ubha kanhaya sanvala jagajethi | bhonvati godhanen vo thatin | ekoni gavalani dhanvati uthauthin vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वेणु वाजवीत यमुनेच्या तटीं । उभा कान्हया सांवळा जगजेठी । भोंवती गोधनें वो थाटीं । एकोनि गवळणी धांवती उठाउठीं वो ॥१॥ ऐसा जनमन मोहनरंजवणा । गुणीं गुणातीत नंदाचा पोसणा । करुनि अकर्ता हा सृष्टयादिरचना । विश्वीं विश्वातीत अलक्ष देखणा वो ॥२॥ बैसोनि विमानीं याच्या पाहो येति खेळा । देव सकळही मिळोनियां पाळा । वोघ कुंठित या यमुनाच्या जळा । वरुषे ब्रम्हानंद नरनारी बाळावों ॥३॥ जलचर भूचर खेचर वनचरें । लुब्ध होऊनियां वेणेचिया स्वरें । राहिलीं तटस्थचि मानसें शरीरें । नेणती वैरभाव एकत्र परस्परें वो ॥४॥ पवन निश्चलचि होऊनियां ठेला । सूर्य अस्तमाना जाऊं विसरला । वत्सें न पिती देहभाव गेला । मुखींचा कवळ गाईमुखींचि राहिला वो ॥५॥ ऐसा स्वानंदाचा आला महापुर । कृष्णवेणुध्वनी लोधले अंतर । नेत्रीं गळताती प्रेमाचे पाझार । निळा म्हणे देहीं देहा अनाचार वो ॥६॥