भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमच्या कीर्तनें पावलों पार

tumachya kirtanen pavalon par

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुमच्या कीर्तनें पावलों पार । भवसिंधूचा लहान थोर । पशुपक्षी दैत्य निशाचर । नारीनर बाळकें ॥१॥ पुण्यपावन तुमची कथा । एकाक्षर श्रवणीं पडतां । झाडा करुनियां दोषां दुरितां । कलिमल तत्वता विध्वंसती ॥२॥ हरिनामाच्या घोष गजरी । ध्वनि रिघतांचि कर्णविवरी । भितरील पातकांचिया हारी । दिशा लंघोनि पळताती ॥३॥ आनंदासि उणेंचि नाहीं । कोंदोनि ठाके अंतर्बाही । नाना चरित्रांची नवाई । श्रोते ऐकोनि संतोषती ॥४॥ गिरी उचलिला गोवर्धन । निजमुखें प्रासिला हुताशन । काळिया आणिला नाथून । मिसें जाऊन चेंडूवाच्या ॥५॥ वत्सें गोवळे चतुराननें । नेतां अवघीं आपणचि होणें । स्तनीं लावितां पूतनाशोषणें । केलीं विंदानें अघटित ॥६॥ परता सारुनियां सागर । माजी रचिलें व्दारकापूर । निद्रा न मोडितां नारीनर । मथुरा नेऊन सांठविली ॥७॥ काळयवनासि ठकिलें कैसें । मुचकुंदावरी नेला पळत्या मिसें । जाळूनि त्याचे केलें कोळसें । आपण निराळा साक्षपणें ॥८॥ भाजीदेठें तृप्त होणें । पांडवा नेणतां ऋषिभोजनें । परीक्षितीसी गर्भीचि रक्षणें । अपूर्व विंदाने श्रीहरीचीं ॥९॥ यशोदेचें स्तनपान करीत । नंदा कडिये विराज तेथ । गोपिकांचे मनोरथ । पूर्ण करित रासक्रीडे ॥१०॥ गौळणी रंजवी नानापरी । दही दूध लोणी त्यांचे चोरी । उणें पडतां त्यांचिये घरीं । अधिकचि करीं वाढूनियां ॥११॥ गायींमागें धांवे रानीं । घोंगडें काठी पावा घेउनी । नानापरीचीं खेळे खेळणीं । लीलाविग्रही अवतारी ॥१२॥ ऐशीं अगाध दिव्य चरित्रें । गाती ऐकती त्यांची गात्रे । अवघीं होऊनियां पवित्रें । जाती वैकुंठा निळा म्हणे ॥१३॥