भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ साधनां वरिष्ठ सार । विठ्ठल नामाचा उच्चार । आणखी नका वोरबार । शीणचि उरेल पुढती

sakal sadhanan varishtha sar | viththal namacha uchchar | anakhi naka vorabar | shinachi urel pudhati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सकळ साधनां वरिष्ठ सार । विठ्ठल नामाचा उच्चार । आणखी नका वोरबार । शीणचि उरेल पुढती ॥१॥ धांवा म्हणोनि अवघे वेगीं । चितचि ठेवा पांडुरंगी । संसारचि तुटेल मागी । फिटेल धगी त्रिविध तापा ॥२॥ आवडी नाचतां पैं गातां । पांडुरंग प्रेमदाता । अवघी तोडूनियां चिंता । करील माथा बैसणें ॥३॥ ऐसें जाणोनियं निरुती । करा हरिनामें आवृत्ति । मग हा कळिकाळाचें हातीं । नेदील तुम्हां सर्वथा ॥४॥ निळा म्हणे सुगम ऐसें । संतीं दाविलें सौरसें । जतन करिती जे मानसें । ते तो पावती सर्वथा ॥५॥