भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुपीं गुंतलीं मानसें । ध्यानीं मुनिजनां ज्याचें पिसें । तेंचि हें सुंदर स्वरुप कैसें । धरिलें भक्त कैवारा

rupin guntalin manasen | dhyanin munijanan jyachen pisen | tenchi hen sundar svarup kaisen | dharilen bhakta kaivara

रचनाकार: संत निळोबा · अभंग
रुपीं गुंतलीं मानसें । ध्यानीं मुनिजनां ज्याचें पिसें । तेंचि हें सुंदर स्वरुप कैसें । धरिलें भक्त कैवारा ॥१॥ अंगी चंदनाची उटी । तुळशी माळाहार कंठी । बुका शोभला लल्लाटीं । रत्नें मुगुटीं झळकती ॥२॥ कर्णी कुंडलें सुढाळें । नेत्र उत्फुल्लीत जैसी कमळें । दंत हिरियचीं व्दिदळें । सोलींव तैसे झळकती ॥३॥ कंठी कौस्तुभ आणि पदकें । श्रीवत्सलांछन ह्रदयीं निकें । एकावळी त्यावरी झळके । मुक्तमोतियें वाटोळीं ॥४॥ हात ठेंवुनी कटावरी । कांसे पितांबराची परी । नाना ठसे उमटले वरी । मेखळा रत्नें बरवंटा ॥५॥ चरण सकुमार साजिरे । पाउलें अत्यंत गोजिरें । वाकी घुंगरु झणत्कारें । करिती चेइरें आनंदा ॥६॥ संतसमुदाये देवढें । गर्जतीं गुणनाम पवाडे । वैष्णव नाचतीं बागडे । ब्रम्हानंद पीकला ॥७॥ राही रुक्मिणी सत्यभामा । परिवारवेष्टित पुरुषोत्तमा । अगाध पंढरीये हा महिमा । देव विमानीं दाटलें ॥८॥ निळा म्हणे पुरला हेत । ठेविलें पायांपाशीं चित्त । सांठवुनियां हदयांत । रुप पावलों विश्रांती ॥९॥