भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहों गेलिया वो नंदाचा नंदन । नेत्रीं लेऊनियां आतींचे अंजन । जेथें उभा होता राजीवलोचन । भोंवते मेळवुनी गडि संतसज्जनें वो

pahon geliya vo nandacha nandan | netrin leuniyan atinche anjan | jethen ubha hota rajivalochan | bhonvate melavuni gadi santasajjanen vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पाहों गेलिया वो नंदाचा नंदन । नेत्रीं लेऊनियां आतींचे अंजन । जेथें उभा होता राजीवलोचन । भोंवते मेळवुनी गडि संतसज्जनें वो ॥१॥ दृष्टी तेथेंहि निवाली वो इंद्रियें सकळ । जालि तटस्थचि देखोनियां घननीळ । मुकुट विराजित कुंडलें वनमाळ । सुंदर श्रीमुख चतुर्भुज सरळ वो ॥२॥ शंख चक्र हातीं गदा पीतांबरधारी । देहुडा पाउलीं वो मुरली अधरीं । वाजवितां सप्तस्वर उमठती माझारीं । देखतां देहभाव नुरतीच शरीरीं वो ॥३॥ वेधी वेधले वो ज्याचे विधाता हरिहर । इंद्र आदिकरुनी सकळहि सुरवर । सिध्द महामुनि योगी ऋषिश्वर । नारद तुंबरादी महानुभव थोर वो ॥४॥ तेंथे कोण पाड आम्हां मानवांचा । ज्यातें न पुरती स्तवितां वेद वाचा । नकळे महिमा वो याच्या स्वरुपाचा । नयनीं पाहतांचि सुकाळ सुखाचा वो ॥५॥ रुप नागर वो सुंदर गोजिरें । चरणीं वाजती वो मंजुळ रुणझुणिती नुपुरें । ऐकतां निजानंदा होतसे चेईरे । निळा म्हणे माझे तेथेंचि मन मुरे वो ॥६॥