भजनी मालिका
← भजनांकडे परत

ओम नमो सिध्दासी नमस्कार केला । ग्रंथारंभ झाला ज्याचे कृपें

om namo sidhdasi namaskar kela | grantharambh jhala jyache krupen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ओम नमो सिध्दासी नमस्कार केला । ग्रंथारंभ झाला ज्याचे कृपें ॥१॥ त्याचिये कृपेचें अदभुत सामर्थ्य । दावी सिध्दपंथ चालावला ॥२॥ चालविला ग्रंथ ज्ञानदेवाभेटी । आले उठाउठी चांगदेव ॥३॥ चांगदेव जन्मविदयेचा आयास । आणि योगाळयास मूळकथा ॥४॥ कथा हे विचित्र करितां श्रवण । पुण्यपरायण होती श्रोते ॥५॥ नारायणडोहो पुण्यक्षेत्र ग्राम । वस्ती गृहस्थाश्रम मुधोपंत ॥६॥ ग्रामलेखनवृत्ति यजुर्वेदी ब्राम्हण । पंचमहायज्ञ कुळशीळ ॥७॥ धर्मपत्नी झाली गर्भातें धरिती । गर्भाधाम रीती संस्कारे ॥८॥ आणूनि कुळगुरु केलें पुंसवन । आले मरुदगण उदरासी ॥९॥ होतां नवमास प्रसूतीचा काळ । उपजला बाळ कुळदीप ॥१०॥ स्वरुपें सुंदर सभार लक्षणी । देखतां लोचणीं मनोहर ॥११॥ अनुलोभन केलें सीमंतनयन । जातीकर्म विधान नामकरण ॥१२॥ बहुतचि चांगलें चांगा म्हणउनी । जनिता जननी नाम ठेवी ॥१३॥ निष्क्रमण आणि अन्नप्राशन झालें । पुढें आरंभिले चौलोपनयन ॥१४॥ व्रतबंध दीक्षा अनुग्रह गायत्री । संध्या वेदमंत्रीं संपादिलीं ॥१५॥ प्रज्ञाशीळ बुध्दि गुरुमुखें ऐकतां । संध्या संपादिलें ॥१६॥ चारी वेद साही शास्त्रें अभ्यासिलीं । अर्थे विचारिलीं स्वानुभवें ॥१७॥ उपवेद आणि उपशास्त्रें घोकिलीं । पुराणे अवगमिलीं अष्टादश ॥१८॥ व्रतें उदयापनें कथानकें वो वसे । अध्यात्में इतिहासें निपुण जाला ॥१९॥ क्षुल्लकादिकमंत्र क्षुल्लकादिक विदया । आभ्यासिल्या सध्या चमत्कृता ॥२०॥ चौदा विदया आणि चौसष्टीही कळा । अध्ययनीं आगळा दुजा नाहीं ॥२१॥ अतीथि ब्राम्हण येती दर्शनासी । वंदुनी चांगयासी करिती पूजा ॥२२॥ म्हणती विदयासिध्द अवतार जाहला । नेणों ब्रम्हा आला येणें वेषें ॥२३॥ सकळांसी हा पूज्य सकळांसी वंदय । सकळांसी हा अदय गुरु होय ॥२४॥ ऐसा स्तुतिवाद करिती ब्राम्हण । समर्पिती धन कनक वस्त्रें ॥२५॥ अमर्याद धन चांगया बहुमान । म्हणती कन्यादान दयावें यासी ॥२६॥ सत्पात्र जोडलें निज भाग्ययोगेसी । करिती मुधोपंतासी विज्ञापना ॥२७॥ वरासी दक्षिणा देऊं शें होन । तंव दुजा म्हणे व्दिगुण देईन मी ॥२८॥ एक म्हणती सहस्त्रमुद्रांचा संकल्प । करितों तरी अल्प्‍ यथाशक्त्या ॥२९॥ महानाम्नी व्रत महाव्रत गोदान । जाहलें उपनयन चतुर्दश ॥३०॥ तंव वेदमूर्ती गुरु बैसवुनी पंगती । पूजन करुनि स्तविती चांगदेव ॥३१॥ या उपरी करा लग्नाचा विचार । हमणती लहान थोर आप्तवर्ग ॥३२॥ विनवित अती नम्र पुसती सकळांसी । उदईक प्रारंभासी ग्रळा कोण ॥३३॥ विनवीत अती नम्र पुसती सकळांसीं । उदईक प्रारंभासी ग्रंथ कोण ॥३४॥ तंव ते विस्मित होउनी बोलती ब्राम्हण । कुळासी मंडण जन्म तुझा ॥३५॥ आतां नाहीं पहावया उरला । एक तो रहिला योग्याभ्यास ॥३६॥ तरी उपदेशा म्हणती चांगदेव । दयावा अनुभव त्याचा स्वामी ॥३७॥ तेवढीच विदया राहातें तें काय । पुरुष प्रश्ना नव्हे श्लाघ्यपण ॥३८॥ तंव ते म्हणती आम्ही नेणों योगमार्ग । नाहीं तो प्रसंग विचारिला ॥३९॥ काय आम्हां चाड तया योगेवीण । करुं संध्यास्नान जपादिपत ॥४०॥ युक्त आहारी जे कां इंद्रियांचे जती । तेचि योग्य होती मार्गी ॥४१॥ मितलें बोलणें मितलें चालणें । मितलें ज्यार घेणें अन्नरसा ॥४२॥ नैराश्य निर्लोभ लौकिकाविरहित । तेचि प्रवर्तत अभ्यासीं या ॥४३॥ हठयोगें करितां प्राणनिरोधन । तो आव्हाटा भरोन विटंबी देहा ॥४४॥ मग हा ना तोसा ठावो नपवोनि साधक । पावती निष्टंक क्षीणता देहे ॥४५॥ काळासी वंचन करितां क्षोभे काळ । मग तो नेदी स्थळ विश्रांतीचें ॥४६॥ नाना विघ्नें लय विक्षेप कशाय । रसस्वादनें अपाय रची त्यासी ॥४७॥ सिध्दीचा संभ्रम घालूनियां आड करी त्याचा नाड स्वहिताचा ॥४८॥ ऐशिया संकटी बळिया तोचि पावे । इतरांसी नागवे दुर्जय पवन ॥४९॥ तरी म्हणती सुज्ञा ऐकावें वचन । आहे तें कारण निस्पृहाचें ॥५०॥ जे अखंड एकांती शुचिष्मंत चित्तीं । तेचि दृढावती योगासनीं ॥५१॥ तरी ते योगी कोठें आहेती स्वामीया । सांगा जाईन पायां शरण त्यांच्या ॥५२॥ तंव व्दिज हमणती योगी नाहींत स्वदेशीं । असती वाराणसीमाजी विरुळे ॥५३॥ तरी म्हणती चांगदेव जाऊं महाक्षेत्रा । योग आणि यात्रा उभय कार्यी ॥५४॥ मग तीर्थरुपा आज्ञा मागोनि यात्रेसी । करिती मुहूर्तेसी स्वस्त्ययन ॥५५॥ क्षौरादिक विधी केलें घृतस्नान । दक्षिणा भोजन देउनी व्दिजां ॥५६॥ गणपती पूजन पुण्याहवाचन । केलें आवाहन पूर्वजांचें ॥५७॥ पूजियेलीं मातापिता उभयतां । आप्तवर्गा गोता गौरविलें ॥५८॥ समर्पिले तयां पुरे ऐसें धन । होय पुनरागमन आपुलें तों ॥५९॥ क्षेत्र प्रदक्षिणा पूजिंलें ब्राम्हणां । वंदिलें चरणां शिष्टांचिया ॥६०॥ निघाले बाहेरी मुहूतें प्रस्थान । आले बहुत जन बोळवित ॥६१॥ ऐकोनि प्रांतवासी आखमदीन जने । विनविती स्तवनें चांगयासी ॥६२॥ म्हणती आम्हां नाहीं घडली वाराणसी । आणि हेत तो मानसी बहूत काळ ॥६३॥ तरी चला समागमें क्षणती चांगदेव । होईल निर्वाहो सर्वांविशीं ॥६४॥ मग अनाथें दुर्बळें निघालीं बाहेरी । चालिलीं परिवारीं लक्षावत ॥६५॥ खर्चा वेंचा तया देती चांगदेव । आणि सांभाळिती सर्व मागें पुढें ॥६६॥ सुसंग जोडला म्हणती सकळ जन । नलगे घेणे ऋण संगे याच्या ॥६७॥ भागल्या श्रमल्या जाणे हा उपाय । रोगें येऊं नये याचे दृष्टी ॥६८॥ चालतां मारगी सामोरे जन येती । ऐकोनि कीर्ति अलौकिक ॥६९॥ महाव्याधी हरी अंधळयासी डोळे । वांझा पुत्रफळें पंगुसी पाय ॥७०॥ जे जे रोगी येती तयांसी उपाय । करिती तया काय उणें मग ॥७१॥ प्रार्थनी करिती पूजा समर्पिती धनें । तोषविती स्तवनें नारीनर ॥७२॥ भरिल्या गाडया धनें वस्त्रांच्या समृध्दी । जाती राजपदीं मिरवत ॥७३॥ ऐसे आले वाराणसी एकोनि व्दिजवर । क्षेत्रवासी भार पाहों आले ॥७४॥ देखोनि योग्यता सकळिकीं पूजिला । बहुमान जाहला महाक्षेत्रीं ॥७५॥ केला तीर्थविधी यथाशास्त्रन्यायें । पूजिलें समुदाये ब्रम्हवृंदा ॥७६॥ ग्रहप्रवृत्तिदानें मठभिक्षा दिधली । अष्ट तीर्थां केली प्रदक्षिणा ॥७७॥ म ग गंध अक्षता व्दिजां करुनी पूजन । आर्तीचें वचन अनुवादती ॥७८॥ म्हणेती कोणा आहे योगाची धारणा । ते म्हणती आपणा गम्य नाहीं ॥७९॥ वेदाध्ययनीं आम्ही स्वधर्मी निरत । नेणों कैसी मात योगाची ते ॥८०॥ यज्ञाचार आम्हां षटकर्मांचा धंदा । नेणो उदावादा पवनाभ्यास ॥८१॥ महा विवरीं एक आहे योगिराज । ऐकतसों सहज कर्णोकणीं ॥८२॥ परी तें स्थळचि परम गुप्त अवघड भयंकर । करवे संचार कोणा तेथें ॥८३॥ तरी म्हणती चांगदेव जाऊं दर्शनासी । केलें स्तंभनासी व्याघ्रसर्पां ॥८४॥ पंचाक्षरी विदया भारियेली भूतें । केलीं शरणागतें वेजाळादी ॥८५॥ तंव प्रार्थिती व्दिजवर नवजावें आपण । काय त्या योगेविण खेळंबलें ॥८६॥ सर्व विदया तुम्हा आहेती स्वाधीन । कोणेविशीं न्युन पडिलें सांगा ॥८७॥ तया म्हणती चांगदेव जी एवढीच उणीव । येते येर सर्व आलोटिलें ॥८८॥ तरी म्हणती देवा ऐकावें वचन । जीवासी येतन तेथें जातां ॥८९॥ दरकुटी विशाळ आहे भयानक । जातां सकळ लोक मुकती प्राणा ॥९०॥ पिशाचें बहुवस असती विंचु सर्प । माजी गडदधुप अंधकार ॥९१॥ घरामाजी घरें व्दारामाजी व्दारें । विवरांत विवरें लक्षवरी ॥९२॥ गेलीया निर्गम नव्हेचि कोणासी । वर्जितों स्वामीसी याचिलागीं ॥९३॥ समागमी सर्व येती काकूलती । अहो कृपामूर्ती चांगदेवा ॥९४॥ नवजावें आपण कदा विवरांत । सांगती आघात सर्व तेथे ॥९५॥ परी चांगदेवा साधणें हदगत । ते नाईकती मात कोणाचीही ॥९६॥ म्हणती आम्हां आहे खर्चावया धन । एक मास पाहेन जावें मार्ग ॥९७॥ करुनियां संचार शोधिलें विवर । गेले योगेश्रवर जेथें होता ॥९८॥ लागोनियां चरणां वेदाक्षरीं स्तविला प्रसन्न तो केला तपोराशी ॥९९॥ तो म्हणे बाळका कैसा तूं आलासी । संचार पवनासी नसतां येथें ॥१००॥ येरु म्हणे स्वामी आपुल्रूा प्रसादें । आला आशिर्वादें चरणांपाशीं ॥२॥ संसारे पीडिलां जहलों खेदक्षीण । म्हणोनि शरण आलों देवा ॥३॥ स्वामीच्य वचनें कजन्मांतरें फेरे । चुकती आणि दुस्तरें हरती कर्मे ॥४॥ करोनियां कृपा म्हणावा जी आपुला । सेवक धाकुला नेणता मी ॥५॥ नुपेक्षावा कदा आला शरणागत । हे तों धर्मनीत स्वमी खरी ॥६॥ हदगत हें माझें पाववावें सिध्दी । अहो कृपानिधी गुरुराया ॥७॥ मज शरणागता करावा उपदेश । सांगा योगाभ्यास करीन मी ॥८॥ विचारिती गुरु आपुल्या मानसीं । म्हणती अनुतापेसी शरण आला ॥९॥ अव्हेरितां यासी येईल दृशण । विरक्त हा पूर्ण् मुमुक्षू जाला ॥१०॥ अनुतापाचें लेणें लेऊनियां अंगी । जाहालासे विरागी देहगेहा ॥११॥ वयें तो लहान दिसतो सगुण । अध्ययनें संपन्न वेदवेत्ता ॥१२॥ सच्छिष्य विरळा जोडे भाग्ययोगें । महिमा ज्याच्या संगे गुरुत्वासी ॥१३॥ देउनी आलिंगन आश्रवसिला कृपा । म्हणती केला बापा अंगिकार ॥१४॥ यथा सांप्रदायें आज्ञा समावेश । दावियेल सौरस परंपरे ॥१५॥ बैसउनी सन्मुख घालविलें आसन । कळा स्थान मान उपदेशिती ॥१६॥ कृपावंत गुरु म्हणती यमनियम । करीं प्राणायाम प्रत्याहार ॥१७॥ ध्यान हे धारणा आसन हे मुद्रा । साधवी शिष्येंद्रा सिध्दीलागीं ॥१८॥ रेचक पूरक कुंभक त्राहाटक । पवनाभ्यास ऐक स्थिरबुध्दि ॥१९॥ सगर्भ अगर्भ दिविले प्रकार । करी पवन स्थिर मनेजयें ॥२०॥ देह शीतल पडतां करी अग्निधारण । सोमधारण उष्णें पडितां देह ॥२१॥ प्राणनिरोधन सोहंमंत्रे जाण ॥ करी प्राणापान ऐक्य दोघां ॥२२॥ षटचक्रांचे भेद दाविले विषद । मुक्त ब्रम्हरंघ्र जेणें ॥२३॥ काकीमुख अग्निचक्र औटपी॥ गोल्हाट । सहस्ऋदळ श्रीहट पावावया ॥२४॥ नाद बिंदू कळा ज्योतीचा अनुभव । जेणें साधे सर्व तें तें आंगे ॥२५॥ जालंधर भेद आंताळी अभ्याळी । भ्रमरगुंफा कंकाळी पावे जेणें ॥२६॥ ऐकतां सादर मुद्रा ठसावली । समाधि लागली चांगयासी ॥२७॥ सद्गुरुच्या वचनें ऐके ज्या ज्या खुणा । पावे त्या त्या स्थाना तेचि क्षणीं ॥२८॥ परी ते सविकल्प समाधी काष्ठा म्हणती तीसी । नावडे संतांसी मूर्च्छा म्हणोनी ॥२९॥ वासनेचा क्षय नव्हे ऐशा रीती । न चुके पुनरावृत्ति जडत्व तें ॥३०॥ देखोनि त्याची प्राप्ति विस्मय करिती गुरु । म्हणती हा चमत्कारु थोर झाला ॥३१॥ एकाचि क्षणें कैसा झाला या अनुभव । प्रज्ञा अभिनव बाळकाची ॥३२॥ बहुत दिवस मीही करितों अभ्यास । परी न लभेचि सौरस याच्या ऐसा ॥३३॥ नवल हें देखिलें एकाचि उपदेशें । भेदियेलीं निमिषें चौदा चक्रें ॥३४॥ भ्रमरगुंफेमाजी केला रहिवास । गिळोनि नि:शेष दशहि प्राण ॥३५॥ ऐशी सप्त वरुषें समाधि भोगिली । सत्रावी शोषिली अमृतकळा ॥३६॥ जिंकोनियां काळ घातला तोडरीं । उभविली गुढी विजयाची ॥३७॥ झाली योगसिध्दि मांडिलें व्युत्थान । केलें उन्मज्जन इंद्रियांचे ॥३८॥ देखोनि गुरुदेव आलिंगन देती । आणि अनुभव मागती समाधीचा ॥३९॥ वचनें तयासी अवस्था लाविली । कसोटी दाविली सिध्दाईची ॥४०॥ घेऊनि अनुभव निघाले बाहेरी । ते आले घाटावरी मनकर्णिके ॥४१॥ तंव त्या देखियेलें तीरींच्या ब्राम्हणीं । ते लागले चरणी्र धवोनियां ॥४२॥ म्हणती समागमी बहू झाले चुकूर । नव्हतां सत्वर तुमचें येणें ॥४३॥ क्षेत्रवासी ब्राम्हणीं करुनियां खेद । म्हणती प्रमाद थोर झाला ॥४४॥ गेले तें सांगती तुमचे ग्रामासी । न येतां तुम्ही रुदन करित ॥४५॥ नेले क्षेत्रामाजी वादयांच्या गंजरीं । घोष जयजयकारीं करुनि हर्षें ॥४६॥ बाणली असुमाई आंगी योगकळा । गुरुत्वें आगळा भसे लोकां ॥४७॥ उपरम झाला सकळ इंद्रियां । स्वरुपी विलया मन गेलें ॥४८॥ ऐसिया स्वानंदे बुझाविवलें चित्त । राहिली अवचित वदनीं वाचा ॥४९॥ अष्टही आविर्भाव उरले आंगी । प्राणी प्राणरंगीं निजवासें ॥५०॥ वेदत्रयी ठसा पडिला शरीरा । वृत्ती गेली घरा निजाचिया ॥५१॥ निमोनियां गेले शब्दाचें बोलणें । पवनुची प्राणें शोषियेला ॥५२॥ ऐसा सुखासुखी पावला विश्रांती । पदपिंडा समाप्ती करुनियां ॥५३॥ देशोदेशीं वार्ता विस्तारली ऐसी ॥ ते येती दर्शनासी सिध्दाचिया ॥५५॥ राजे भेटी येती अनुग्रहीत होती । आशीर्वाद इच्छिती लहानथोर ॥५६॥ जया जे जे पाहिजे ते ते विदया देती । म्हणोनी शरण येती प्राणीमात्र ॥५७॥ नाना उपासना शिकती बीजें न्यास । मंत्रादि यंत्रांस करिती साध्य ॥५८॥ वेदांचीं अध्ययनें शास्त्रांची परिज्ञानें । शिकती रसायनें चिकित्सा नाडी ॥५९॥ ज्योतिष आयुर्वेद निघंट घेकिती । कोश विचारित पंचाक्षरा ॥६०॥ जारणमारणादि सप्तही प्रयोग । एक ते आगम योग करिती साध्य ॥६१॥ गारुडाचे दंश नृत्य संगीतास । घेती बहुत शिष्य विदया ॥६२॥ असो आतां ऐसे शिष्य लक्षवत । झाले शरणागत करिती सेवा ॥६३॥ यावरी व्दितीय प्रकरणींची कथा । परिसावी ते श्रोता देउनी चित्त ॥६४॥ निळा म्हणे पुढें ज्ञानेश्वर आख्यान । अदभुत महिमान सिध्दाईचें ॥६५॥ ॥ इति श्रीचांगदेवचरित्रे जन्मकर्म विदयायोगाभ्यासकथनं नाम प्रथम प्रकरणं समाप्तम ॥