भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्यानंदा पुढे आनंद तो कोण । विषयसुख बाई बापुडें तें क्षीण । जेथें न सरेची वैकुंठसदन । शेषशयी वो त्रिकुटभुवन वो

nityananda pudhe anand to kon | vishayasukh bai bapuden ten kshin | jethen na sarechi vaikunthasadan | sheshashayi vo trikutabhuvan vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नित्यानंदा पुढे आनंद तो कोण । विषयसुख बाई बापुडें तें क्षीण । जेथें न सरेची वैकुंठसदन । शेषशयी वो त्रिकुटभुवन वो ॥१॥ नेघों म्हणोनियां त्यागिती परौतें । घेऊं संगसुख हरीच्या सांगातें । गाऊं वानूं रुप पाहोनि निरुतें । हांसो खेळों ठायीं जेववूं सांगातें वों ॥२॥ नेघों समाधीचें सुख तुच्छ वाटे । नित्यनित्याचिये न पडों खटपटे । काय करुं ते तपाचे बोभाटे । एका हरिविण अवघी ते फलकटे वो ॥३॥ काय जाऊनियां करुं निजधामा । तेथें मी नातुडें नाडळें विश्रामा । येथें सांडूनियां तमालमेघ:शामा । नेघों नाईका आणिका दुर्गमा वो ॥४॥ स्वर्गभोग तेही न लागती असार । क्षणें होती जाती क्षणेंचि नैश्वर । येथें हरिसंगे क्रीडों निरंतर । सर्वही सुखांचे हा जोडला आगर वो ॥५॥ निळा म्हणे नित्य नि:सीम स्वानुभवें । ऐशा गोपिका त्या रंगल्या हरिसवें । अधिकाधिक् हें प्रेम त्यांचे नवें । जाणोनि आवडी ते पुरविली देवें वो ॥६॥