भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेत्र झांकविले ते हरी । कारण इतुलेंचि अभ्यंतरी । मज विराट झालियावरी । छळतील हे देखतां

netra jhankavile te hari | karan itulenchi abhyantari | maj virat jhaliyavari | chhalatil he dekhatan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नेत्र झांकविले ते हरी । कारण इतुलेंचि अभ्यंतरी । मज विराट झालियावरी । छळतील हे देखतां ॥१॥ तंव तें भावार्थी चोखडे । त्याणीं देखिलें तें निवाडें । मग नाचती कृष्णापुढें । कीर्ति त्याची वर्णित ॥२॥ म्हणति मागेंही याचिपरी । केलीं चरित्रें तुवां हरी । शेषिली पूतना निशाचरी । अघाबकांतें चिरिलें तें ॥३॥ तुझिये अंगीं सर्व कळा । नेतां ब्रम्हायानें आम्हां सकळां । तैसेंचि होऊनियां गोपाळा । दोहीं ठाई रक्षिलें ॥४॥ आजीं कळला तुझा महिमा । नेणतिया गोवळां जी आम्हां । करीं अपराध आमुचें क्षमा । तुज उच्छिष्टें चारिलीं तें ॥५॥ बेटया म्हणोन बोभाइलें । शिव्या देउनी आळविलें । खेळतां डावहि मागितले । भांडण केलें नेणतां तुज ॥६॥ निळा म्हणे सहस्त्रवरी । नमस्कार केले ऐसे हरी । तेणेंचि तोषोनियां उत्तरीं । बोले तुम्ही सखे माझे ॥७॥