भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहींचि तुम्हां भीडचाड । येथें करुं अल्याति बडबड । कृष्ण माझा अवघ्यांसीं गोड । तुम्हांसी कां गे वीट याचा

nahinchi tumhan bhidachad | yethen karun alyati badabad | krushna majha avaghyansin god | tumhansi kan ge vit yacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहींचि तुम्हां भीडचाड । येथें करुं अल्याति बडबड । कृष्ण माझा अवघ्यांसीं गोड । तुम्हांसी कां गे वीट याचा ॥१॥ जाऊं नेणेचि बाहेरी । तयावरी घालितां गे तुम्ही चोरी । आलगटा अवघ्याचि नारी । नसतींच गाहाणीं आणित्या ॥२॥ घरीं काय त्या उणें झालें । जे तुम्हां घरी दूध दहीं चारिलें । नेऊनियां कोठें सांठविलें । कृष्ण खणार तें किती ॥३॥ लेंकरुं माझें कोडिसवाणें । विकारमात्र कांहींची नेणे । तयासी शिनळ चोर हें म्हणणें । फजीत पावणें आहे तुम्हां ॥४॥ जा गे आतां धरुनि आणा । खोटें शिनळिय येरी श्रीकृष्णा । नाहीं तरी फजीतपणा । व्यर्थचि पावाल या बोलीं ॥५॥ कृष्ण तो अंतर्बाह्य निर्मळ । जैसी कां शुध्द स्फटिक शीळ । तया चोरियेचा लावितां मळ । जिव्हा कांटतील तुमचिया ॥६॥ निळा म्हणे परिसोनी येरा । क्रोधेंचि चालिल्या आपुल्या घरा । म्हणती धरुनियां श्रीवरा । आणूं तैसाचि इयेपाशीं ॥७॥