भजनी मालिका
← भजनांकडे परत

न कळेचि अदृष्टाची गती । न कळे कर्माकर्माची संभूती । न कळे मृत्यूचीही रीती । कैशी घडवील कोण वेळ

na kalechi adrushtachi gati | na kale karmakarmachi sambhuti | na kale mrutyuchihi riti | kaishi ghadavil kon vel

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न कळेचि अदृष्टाची गती । न कळे कर्माकर्माची संभूती । न कळे मृत्यूचीही रीती । कैशी घडवील कोण वेळ ॥१॥ न कळे कर्माकमाची संभूती । न कळे होणार तें बळीवंत । भोगणें भोगवील अकस्मात् । न कळे विधीचेंही लिखित । जें कां रेखियलें निढळी ॥२॥ कंसराव चिंताग्रस्त । उठुनी बैसला सभेआंत । प्रधान सेनाधिप समस्त । ग्लान वदनें भासती ॥३॥ पुढील विचार सुचितां । न सुचे कांहीची त्या तत्वतां । कृष्ण धाकेंचि त्याचिया चित्ता । धरचि कोठें न सांपडे ॥४॥ मग बोले कंसासुर । सेना सिध्द करा भार । जाऊनियां अति सत्वर । वधा हो कुमर नंदाचा ॥५॥ तंव ते म्हणती रायाप्रती । बळाची तेथें न चलें युकती । पहा ते पूतनेची शक्‍ती । इंद्रादिकांसी अलोट ॥६॥ निमिषमात्रें तिची शांती । ठेला करुनियां श्रीपती । तंव त्या माभळभट बोलती । नव्हे हें कार्य स्त्रियांचे ॥७॥ आम्हां ब्राम्हणांचे हे कृत्य । जाणे सकळांचेही घटित । दयाल आज्ञा तरी मी तेथें । जाऊनियां साधीन कार्यार्थ ॥८॥ निळा म्हणे बोलतां ऐसें । अवघे उल्हासले मानसें । म्हणती यथार्थ हे ऐसें । ऋषी बोलिले माभळ ॥९॥