भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी मज माझीयाचा तुटला संबंध । ऐसा लाविला वो येणें मज वेध । जिविं जीवाचा हा मोडिल कंद । नुरे देहभाव ऐसा केला बोध वो

mi maj majhiyacha tutala sambandh | aisa lavila vo yenen maj vedh | jivin jivacha ha modil kand | nure dehabhav aisa kela bodh vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मी मज माझीयाचा तुटला संबंध । ऐसा लाविला वो येणें मज वेध । जिविं जीवाचा हा मोडिल कंद । नुरे देहभाव ऐसा केला बोध वो ॥१॥ सखिये साजणी वो ऐके माझें गुज । याति पाहतां वो बोलतां सहज । नेलें हरुनियां अंतरींचें निज । पुढें नाचवि हा आपलेंचि भोज वो ॥२॥ करितां कामधाम विसरुचि पडे । ध्यानिं आठवे हो याचेचि रुपडे । राहें वेष्टूनियां हाचि मागें पुढें । याविण न दिसेचि केले मज वेडे वो ॥३॥ करितां भोजन वो निजतां शयनीं । जागृतिं जागतां वो बोलतां वदनिं । हाचि जडोनियां ठेला माझें मनीं । नेदि हा पारिखेचि दिसों जनिंवनिं वो ॥४॥ नेदि उमजो हा येऊं देहावरि । केलि माझिया संसारा बोहरी । हाचि व्यापुनियां ठेला घरींदारीं । ऐसा नाटक हा नंदाचा खिल्लारि वो ॥५॥ येणें ऐशाचि वो मोहिल्या सुंदरा । नेल्या भुलउनि आपुल्या मंदिरा । हें मी नेणोनियां गेले याच्या दारा । तव निळा म्हणे वेधिले अंतरा वो ॥६॥