भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी मज माझें याची केली वो निरास । वीण आपणा येणें आणियेला त्रास । नेदी आड येऊं दुजियाचा आभास । कैसें काय करुं सांगा मज यास वो

mi maj majhen yachi keli vo niras | vin apana yenen aniyela tras | nedi ad yeun dujiyacha abhas | kaisen kay karun sanga maj yas vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मी मज माझें याची केली वो निरास । वीण आपणा येणें आणियेला त्रास । नेदी आड येऊं दुजियाचा आभास । कैसें काय करुं सांगा मज यास वो ॥१॥ ऐसें जाजावोनी बोले एक नारी । हरीचा सुखानंद भरुनी अंतरी । लटिकाची वालभाचा भाव लोकाचारीं । दाऊनि एकांतीं हरिसी काम सारी वो ॥२॥ म्हणे वृत्ति माझी नुरे देहावरीं । क्षणही न कंठे वो सासुरामाहेरीं । काय करुं मी वो न गमे घरदारीं । नेऊनी घाला जेथें अनंग मुरारी वो ॥३॥ यावरी गेलें आतां माझें माणुसपण । करितां उपचार ते हरिती माझे प्राण । गेलें होऊनियां होतें तें निर्माण । सोडा आस माझी दया वो मोकलून वो ॥४॥ ऐशीं देहगेहीं होऊनि उदास । गेले तुटोनियां अवघे आशापाश । निद्रा जागृती ना स्वप्नाचा आभास । एक लागला त्या हरीचा निजध्यास वो ॥५॥ निळा म्हणे नेणे आपपर दुसरें । भरली निजानंदी न पाहे माघारें । कैंचे येईल तेथें अविदयेचें वारें । झालें ह्रदयीं स्वानुभवचेईरें वो ॥६॥