भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणती नको नको जाऊं हरी । सांडोनी आम्हां कोठें दुरी । तुजवांचोनिया संसारी । कोण आम्हां जिवलग

mhanati nako nako jaun hari | sandoni amhan kothen duri | tujavanchoniya sansari | kon amhan jivalag

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणती नको नको जाऊं हरी । सांडोनी आम्हां कोठें दुरी । तुजवांचोनिया संसारी । कोण आम्हां जिवलग ॥१॥ जातील प्राण तुतें जातां । वियोग न साहावे तें व्यथा । पळमात्रचि वेंगळे पडतां । जेविं कां मासोळी जळांतील ॥२॥ नव्हे अक्रूर झाढीवर । करुं आला येथें संहार । जीवन नेलिया यदुवीर । आम्हां सहजचि प्राणांतु ॥३॥ इतुक्यांचिही येईल हत्या । जरि तू कृष्णा नसील आतां । ऐसे बोलोनियां समस्ता । लोळती कृष्णचरणावरीं ॥४॥ वधुनी आम्हां आपुल्या हातें । जाई मग तूं जाणें तेथें । करुनियां दीर्घ् रुदनातें । उकसाबुकसी स्फुंदती ॥५॥ आमुचा जीव तूंचि प्राण । तुजविण न वाचों तुझीचि आण । नको आमुचें हें निर्वाण । पाहों आपुले निज नेत्रीं ॥६॥ निळा म्हणे यावरी हरी । शांतवी तया निज उत्तरीं । म्हणें आम्ही वरावरी । येऊं भेटोनी मामासी ॥७॥