भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणती दसवंतीये देख देख । वोजे पाहे याचें मुख । लोणीं माखलें साजूक । आणि दहींही गिरबडलें ते वरी

mhanati dasavantiye dekh dekh | voje pahe yachen mukh | lonin makhalen sajuk | ani dahinhi girabadalen te vari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणती दसवंतीये देख देख । वोजे पाहे याचें मुख । लोणीं माखलें साजूक । आणि दहींही गिरबडलें ते वरी ॥१॥ पाहे यशोदा जंव निर्धारी । तंव माग देखे मुखावरी । मग झडपिती अवघ्या नारी । कैसें बोलत होतीसी ॥२॥ याचिपरी आमुच्या सुना । कुमारीही लाविल्या ध्याना । सांगता हें तुमच्या मना । सत्य नव्हतें वाटत ॥३॥ आतां शासन करिशील तरी । खोंडी सांडील हा वो निर्धारीं । नाहीं तरी नाकळे हरी । नित्य कलह तुम्हां आम्हां ॥४॥ लाडिका तरी बांध गळां । परी नको सोडूं हा मोकळा । आम्ही उत्तीर्ण आपुल्या बोला । सांगोनियां या काळें ॥५॥ यावरी चोरिये देखतां । न सोडें जिवें या तत्त्वतां । नेऊंनियां निज एकांता । बांधू गांठी जिवाचिये ॥६॥ येणें गोरसाची धुणी । करुनि फोडियेली दुधाणीं । त्याचाहि हिशेब तुज लागुनी । न देववे यशोदे सर्वथा ॥७॥ ऐशिया निकुरेंसी या नारी । शिव्याहि देती तोंडचिवरी । म्हणती यशोदे तुझी ही थोरी । नुरेल यावरी जाण गे ॥८॥ निळा म्हणे खादलें वित्त । देणें लागेल तुज तें सत्य । ऐसेही दावूनियां संकेत । ताडिती कृष्णा निज करें ॥९॥