भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेळवितांचि हातीं हात । आसुडिले ते अकस्मात । हें देखोनियां लोक समस्त । ठेले विस्मित अवलोकिती

melavitanchi hatin hat | asudile te akasmat | hen dekhoniyan lok samasta | thele vismit avalokiti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मेळवितांचि हातीं हात । आसुडिले ते अकस्मात । हें देखोनियां लोक समस्त । ठेले विस्मित अवलोकिती ॥१॥ एक एका धरितीं करीं । दाविती चिकाटियाच्या परी । दंडिमुडपी उरीं शिरीं । मारिती धडका परस्‍परें ॥२॥ पायीं पाय आडवे तिडवे । गाउनी दाविती शक्तिवैभवें । वज्र मिठियाचीं लाघवें दाविती सुहावे येरयेरां ॥३॥ कोणिचि नाटोपती कोणा । चक्राकार भेदिती खुणा । रगा लाविती चाऊनि दर्शना । आक्रोशें माना मुरगाळिती ॥४॥ शेंडया उपटूनियां सांडिती । घे घें म्हणोनियां झोंबती । येरयेरां पृष्ठीवरी ताडिती । मिठिया घालिती येरयेरां ॥५॥ एक वरदी एक ईश्वर । उभया युध्दाचा परिचार । परी लाघविया हा सारंगधर । आणि बळिराम अवतारिया ॥६॥ निळा म्हणे वर्मभेदका । पुढें कवणाचा आवांका । पाहोनी मृत्युकाळ नेटका । उपटूनि भूमितें त्राहाटिलें ॥७॥