भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिया भावाचें खंडण । नव्हे ऐसें करा दान । मुखी नाम तुमचें स्‍मरण । राहो चरणावरीं दृष्टी

majhiya bhavachen khandan | navhe aisen kara dan | mukhi nam tumachen s‍maran | raho charanavarin drushti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माझिया भावाचें खंडण । नव्हे ऐसें करा दान । मुखी नाम तुमचें स्‍मरण । राहो चरणावरीं दृष्टी ॥१॥ आणखी मी न मागें कांहीं । वसो प्रेम तुमच्या ठायीं । करुनि कृपा आठव देई । आवडी कीर्तनीं सर्वदां ॥२॥ सुखें भोगीन प्रारब्धठेवा । येईल तैसा वोढवोनि देवा । मानामान न करीं हेवा । विसर न पडावा तुमचाची ॥३॥ काय करतील निंदक जन । आसना ठायीं सावधान । तुमचें करितां नित्य चिंतन । कैंचें बंधन आम्हां दासां ॥४॥ गाईन गुण तुमचे गीतीं । विषय-वासना-दिकां शांती । तुमच्या पायीं जडतां प्रीती । निळा विनंति करी ऐसी ॥५॥