भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी पूजा हेंचि अर्चन । तुमचें नामसंकीर्तन । नेणें करुं वेदाध्ययन । नेणें आसन योगाचें

majhi puja henchi archan | tumachen namasankirtan | nenen karun vedadhyayan | nenen asan yogachen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माझी पूजा हेंचि अर्चन । तुमचें नामसंकीर्तन । नेणें करुं वेदाध्ययन । नेणें आसन योगाचें ॥१॥ म्हणोनि येतों काकुलती । अत्यंत मूढ आहे माझी मती । नेणें करुं तुमची स्तुती । अहो जगत्पती पुराणपुरुषा ॥२॥ कैसें होईल तें मी नेणें । भूत भविष्य वर्तमानें । अल्पबुध्दी माझें जिणें । मूढपणें वर्तणूक ॥३॥ यालागीं तुमचें धरिलें नाम । तुमचे स्तवनीं ठेविलें प्रेम । न कळे आणिक न चले नेम । साधन दुर्गम मज वाटे ॥४॥ नेणें तीर्था पलाटण । नेणें मंत्राचें पुरश्चरण । नेणें योगयाग सांख्यज्ञान । नेणें करुं ध्यान तुमची पूजा ॥५॥ नेणें कैसी माझी करुणा । येईल तुम्हां नारायणा । नेणें वर्णू तुमच्या गुणा । नेणें धारणा व्रतनिष्ठा ॥६॥ नाहीं वाचासंस्कार । नाहीं घोकिलें जी अक्षर । नेणें करुं यज्ञाचार । स्वधर्म तोहि विधियुक्त ॥७॥ निळा म्हणे सर्वांपरी । आहें मूर्ख मी श्रीहरी । ताराल ऐसिया नवल तरी । तुमची थोरी प्रगटेल ॥८॥