भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी मजचि वो पडियली भुली । गेलें मर्यादा वो विसरोनि आपुली । याची अणुमात्र पडतांचि साउली । वृत्ति तदाकार होऊनियां ठेली वो

majhi majachi vo padiyali bhuli | gelen maryada vo visaroni apuli | yachi anumatra padatanchi sauli | vrutti tadakar houniyan theli vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माझी मजचि वो पडियली भुली । गेलें मर्यादा वो विसरोनि आपुली । याची अणुमात्र पडतांचि साउली । वृत्ति तदाकार होऊनियां ठेली वो ॥१॥ आलें वाचें तेंचि करितें बडबड । नये भ्रांतीचें वो वस्त्र दृष्टी आड । मना आलें तैसा नाचतें धुमाड । नेणों काय पुढें आरंभला नाड वो ॥२॥ नाहीं देखिलें तें येऊनि पडे दृष्टी । तेंचि उच्चारें वो येऊनि वाचे ओंठी । नेणोनि अनुभवा ज्ञानाची कसोटी । नेणों काय येऊनि सांठवलें पोटीं वो ॥३॥ वाचे अनिर्वाच्य येऊनि आदळे । ह्रदयीं वाउगेचि होताती सोहळे । उठिति स्फुर्तिचेचि क्षणक्षणां उमाळे । माझिये जाणिवेचें फोडूनि पेंडोळें वो ॥४॥ होतें तैसें तुम्हां निवेदिलें पांई । न कळे यावरी तुमचे कृपेची नवाई । ठेवाल जैसें तेथें रहावें ते ठायीं । कैची सत्ता आम्हां बोलावें तें काई वो ॥५॥ यावरी कराल तें तुम्हीं करा देवा । मीं तों नुरोनियां उरलें देहभावा । कांहिंचि नेणोनियां हिताहित तेव्हां । निळा म्हणे साक्षी तुम्हीचि या सर्वा वो ॥६॥