भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग पाय ठेऊनि खांदियेवरी । चेंडा झेपावला हरी । ऐसें देखोनियां इतरीं । केला कल्लोळ खालुता

mag pay theuni khandiyevari | chenda jhepavala hari | aisen dekhoniyan itarin | kela kallol khaluta

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग पाय ठेऊनि खांदियेवरी । चेंडा झेपावला हरी । ऐसें देखोनियां इतरीं । केला कल्लोळ खालुता ॥१॥ म्हणती रे नको नको हरी । जाऊं तिये खांदीयेवरी । आम्हां तुझी आई घरीं । गांजिल ऐसें करुं नकों ॥२॥ तयांप्रति म्हणोनि बरें । खांदि मोडियली भारें । ते आपण येकचि सरें । पाडियला डोहांत ॥३॥ देखानियां ते अवघे गडी । शंख करिती थडोथडीं । अंगे घालोनियां गडबडी । लोळती भुई आक्रंदत ॥४॥ म्हणति गेला रे महादाश्रय । तयाविण आम्हीं पोरटी काय । नाहीं दवावया ठाय । तोंड आतां कोणीकडें ॥५॥ काय म्हणेल ते दसवंती । लोकहि आम्हां फजीत करिति । म्हणती कां जाऊं दिला श्रीपती । तुम्हीं तया झाडावरी ॥६॥ हाणेनि घेती उरावरी । मस्तका ताडिती निजकरीं । गाई हांबरडे हाणीती वरी । दु:ख भारी न सोसवे ॥७॥ गांवांमाजी गेली वार्ता । लोकहि धांवले ऐकतां । नंदयशोदे प्राणांत अवस्था । हो सरली तेचि क्षणी ॥८॥ घरोघरीं हाहाकार । शोक करिती नारीनर । ठाकूनि आलीं तीर । तंव तो कहार गोवळांचा ॥९॥ यशोदा म्हणे दावा हरी । केउता गेलारे गे मुरारी । नंदही दीर्घ रुदन करी । म्हणे हरपला गोविंद ॥१०॥ दारिद्रीया हातीं रत्न । लागलें न धरे करितां यत्न । तैसि परी झाली म्हणोन । नंद लोळे गडबडा ॥११॥ असो तो दु:खार्णव सांगता । पाषाण फुटती तत्त्वतां । मग समोखुनीया उभयता । लोक घेऊनि घरा आले ॥१२॥ एका कृष्णविणं नगर । वोस दिसे भयंकर । दु:खार्णवीं नारीनर । पडले तैसेंचि मातापिता ॥१३॥ निळा म्हणे इकडे हरि । रिगोनियां सर्पविवरीं । विखार काडिला बाहेरी । काळया तो नाथुनि ॥१४॥