भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग ओवाळूनियां मृतिका । घेतलें उचलुनि यदुनायका । यशोदा म्हणे हे बाळका । वरूनि अरिष्ट चुकलें

mag ovaluniyan mrutika | ghetalen uchaluni yadunayaka | yashoda mhane he balaka | varuni arishta chukalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग ओवाळूनियां मृतिका । घेतलें उचलुनि यदुनायका । यशोदा म्हणे हे बाळका । वरूनि अरिष्ट चुकलें ॥१॥ नव्हे शकटे तो मायावी दैत्य । आला होता करावया घात । कृष्ण ताडिला तो यथार्थ । पूतनेऐशी परी केली ॥२॥ तेणें दिधली आरोळी । न्या हा उठे तो अंतराळी । परी नाही भयाची काजळी । सावध वनमाळी सर्व गुणें ॥३॥ ऐसे क्रमिले कांही दिवस । तंव रायें पाठविलें लोकांस । मग येऊनि गोकुळास । पुनिरपि वस्ती राहिले ॥४॥ कृष्ण खेळतां आंगणी । गडी म्हणती सारंगपाणी । हाराळी नूतन हे कापुनी । चारू वत्सासि आपुलिया ॥५॥ तंव तो तृणावृत दैत्य । हाराळी रुपें होता तेथ । इच्छूनियां कृष्णघात । तंव तो हरीनें ओळखिला ॥६॥ म्हणे पळारे तुम्ही अवघे गडे । येथें दिसत असें हें कुडें । रहा अवघे मागलिकडे । आपण्‍ पुढें संचारला ॥७॥ तेणें देखतांचि श्रीहरी । वदनें काढिली तृणांकुरी । शते सहस्त्र लक्षवरी । रुपें धरुनिया ठाकला ॥८॥ भयानकें अति विक्राळें । दाढा दंत दीर्घ शिसाळे । आवाळुवे चाटीत आवेश बळें । कृष्णा अंगी झगटला ॥९॥ निळा म्हणे कवळूनिया मुष्टी । मुख्य तृणासुराची झोटी । उपटूनियां भूमी नेहटीं । शतचूर्ण करुनि सांडिला ॥१०॥