भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोटी मदनाचा बाप । प्रभा फांकली तेज अमूप । भूषणें विराजलीं दिव्य स्वरुप । नंदे पाहिला निज नयनीं

koti madanacha bap | prabha phankali tej amup | bhushanen virajalin divya svarup | nande pahila nij nayanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कोटी मदनाचा बाप । प्रभा फांकली तेज अमूप । भूषणें विराजलीं दिव्य स्वरुप । नंदे पाहिला निज नयनीं ॥१॥ मग याशोदेपाशीं आणिला । म्हणे हा वसुदेव दिधला । येरी म्हणे हा चोरियेला । कोणाचा तानुला न कळे हें ॥२॥ वसुदेव सदाचा भिकारी । बंदी कंसाचिये चिरकाळ वरी । बालक सुलक्षण हा निर्धारी । असेल सभाग्या समर्थाचा ॥३॥ येरु म्हणे आहे पोंटीचा । आत्मा जिवलगु हा आमुचा । नाहीं वो आणिका लोकांचा । म्हणोनियां देतों तुम्हांप्रती ॥४॥ येरो म्हणे आमुचें कन्यारत्न । याच्या पालटा न्या करा यत्न । कंसा पुसतांचि तया दाउन । चुकवा अरिष्ट सकळांचे ॥५॥ यावरी कृष्णातें निरवून । वसुदेव निघाला माया घेउन । पुढती बंधने पावला बंदिखान । विचित्र विदांन शक्तींचे ।६॥ श्रीकृष्णदेवेसी अंतरावो । होतांचि प्राप्त झाला मोहो । अविद्यायोगें चिंताप्रवाहो । महार्णर्वी पडियेला ॥७॥ निळा म्हणे हिताहित । नाठवेचि कांही झाला भ्रांत । मायादेवाची हा प्रघात । झाला आप्त वसुदेवा ॥८॥