भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितांचि सीमा उल्लंगन । म्हणती अक्रूरा ऐकें वचन । तुवां जावें रथ घेऊन । सांगावें वर्तमान रायासी

karitanchi sima ullangan | mhanati akrura aiken vachan | tuvan javen rath gheun | sangaven vartaman rayasi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
करितांचि सीमा उल्लंगन । म्हणती अक्रूरा ऐकें वचन । तुवां जावें रथ घेऊन । सांगावें वर्तमान रायासी ॥१॥ तेणें आज्ञा वंदुनी शिरीं । चालिला पुढें वेगें करी । बळराम कृष्ण गोवळ भारी । आले बळिया रजकापें ॥२॥ तंव तो वस्त्रें वाळवीत । उभा असे बळप्रमत्त । गोवळांते असे पुसंत । तुम्ही आलेती कोठुनी ॥३॥ ते म्हणती गोकुळवासी । जातों रायाचे भेटीसी । आदरें बोलाविलें कृष्णासी । आणि बळीराम सुजाणा ॥४॥ येरु म्हणे कोणता कृष्ण । गोवळ तुम्ही अवघे जण । आंलेती घोंगडी पांघरोन । जाल कैसेन रायापुढें ॥५॥ तंव कृष्ण बळिराम म्हणे त्यासी । आम्हां देंई उत्तम वस्त्रांसी । भेटोनी आलीया रायासी । देऊं उचित आणी तुझी वस्त्रें ॥६॥ तंव तो म्हणे भाग्यासी याल । बोलतांचि ऐसें ताडण पावाल । राजवस्त्रें हीं तुम्ही ल्याल । तैंचि वेंचाल जीवें प्राणें ॥७॥ बळिरामें हें ऐकतांचि कानीं । म्हणे वस्त्रें आणा रे लुटुनी । शंका मात्र न धरितां मनीं । हरा आवडती ज्या जैसीं ॥८॥ निळा म्हणे धांवले सकळ । बळिये अतुर्बळी गोवळ । तेथें झाला हालकल्होळ । रजक बळिया धांविन्नला ॥९॥