भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें पृथ्वीसीं धरीलें । सूर्या प्रकाश उटिलें । चंद्रबिंबीं अमृत ठेविलें । तेणें निववीत जगा तो

jenen pruthvisin dharilen | surya prakash utilen | chandrabimbin amrut thevilen | tenen nivavit jaga to

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जेणें पृथ्वीसीं धरीलें । सूर्या प्रकाश उटिलें । चंद्रबिंबीं अमृत ठेविलें । तेणें निववीत जगा तो ॥१॥ गगना पवाडू दिधला । मेरुस्तंभ उभारिला । गती पवनही उडविला । दाही दिशा फिरतसे ॥२॥ जेणें अग्नीसी दीपन । जीवनीं ठेविलें जीवन । आपोनिधी जळें पूर्ण । क्षीरें सागर भरियेला ॥३॥ नाना अन्नीं ठेविली तृप्ति । नाना परिमळ पुष्पयाती । नाना रसस्वाद फळाप्रति । एवढी युक्ती कोणाची ॥४॥ अपार चांदणे फुलोरा । जेणें शोभविलें अंबरा । पर्जन्याच्या करुनी धारा । जेणें पिकविलें धरणीतें ॥५॥ जेणें इ्रद्रादिकां देवां । पदीं स्थापुनी वांटिल्या सेवा । जेणें मर्दुनी दैत्य दानवां । केला सांभाळ भक्तांचा ॥६॥ जो या प्राणातें चाळिता । जीवा जिवणें ज्याचिया सत्ता । मनीं संकल्पाचिया चळथा । उठवी सत्ता हे कोणा ॥७॥ जो या श्रुतीतें पढविता । परमामृमातें जीववीता । सूर्या अंजन लेवविता । अवधी सत्ता हे ज्याची ॥८॥ चराचर व्यापूनियां उरला । उभा विटेवरीं ठाकला । निळा म्हणे तेणें केला । बुध्दी माझीये प्रकाश ॥९॥