भजनी मालिका
← भजनांकडे परत

जरी तो येईल येथें हरी । तरी मी सहसा विलंब न करीं । धोपटूनिया शिळेवरी । तेच क्षणी टाकीन

jari to yeil yethen hari | tari mi sahasa vilamb na karin | dhopatuniya shilevari | tech kshani takin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जरी तो येईल येथें हरी । तरी मी सहसा विलंब न करीं । धोपटूनिया शिळेवरी । तेच क्षणी टाकीन ॥१॥ काळासम तुल्य माझें बळ । काय तें करील कृष्ण गोवळ । लागों नेदितां एकही पळ । निमिषाधेंचि उपटीन ॥२॥ गोकुळाचिये वाटेवरी । धुणें माझें निंरतरी । परि आलाचि पाहिजे वैरी । तुझा आणि माझाही ॥३॥ मागें पाठविले असुर । मायावी ते निशाचर । ते काय बापुडे किंकर । माझिये बळ शक्तीपुढें ॥४॥ राया येथें एक वेळां । आणवीं पां तया गोवळा । मग तूं कौतुक पाहें डोळां । मृत्युपंथे लावीन ॥५॥ आम्ही तुझे अंगलग । सेवक आणि बळिये चांग । रोखूनियां असों मार्ग । माझे धुणें त्याचि पंथे ॥६॥ निळा म्हणे ऐशा वचनीं । राजा संतोषविला मनीं । मग तो उचितातें घेउनीं । आला आपुलिया मंदिरां ॥७॥