भजनी मालिका
← भजनांकडे परत

होतें बहुत दिवस आर्त वागविलें । आजी अकत्मात तें फळ देऊं आलें । दृष्टी श्रीहरीची देखिलीं पाऊलें । घेतलें जन्म मागें सार्थक त्यांचे झालें वो

hoten bahut divas arta vagavilen | aji akatmat ten phal deun alen | drushti shriharichi dekhilin paulen | ghetalen janma magen sarthak tyanche jhalen vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
होतें बहुत दिवस आर्त वागविलें । आजी अकत्मात तें फळ देऊं आलें । दृष्टी श्रीहरीची देखिलीं पाऊलें । घेतलें जन्म मागें सार्थक त्यांचे झालें वो ॥१॥ धन्य हे आनंदाची सापडली वेळ । तेणें संत सज्जन भेटले कृपाळ । त्यांनींचि फेडियेला बुध्दीचा वो मळ । दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ वो ॥२॥ नाना साधनांच्या केलिया खटपटा । परी त्या न पावतीचि वो याच्या दारवंटा । जाणो जातां जाणिव घाली आडफांटा । योगाभ्यासें सिध्दी रोधिताती वाटा वो ॥३॥ यज्ञयागें स्वर्गभोग आड येती । करितां तपें काम क्रोध खवळती । नित्यानित्यज्ञानें अभिमान वाढती । करितां तीर्थाटनें अहंकाराचीचि प्राप्ती वो ॥४॥ जपतां मंत्रबीजें चळचि घाली घाला । करीतां दान धर्म पुढें भोगवितो फळा । सोंवळे मिरवितां विधिनिषेध आगळा । आतां हेंचि बरवे धणी पाहों याला वो ॥५॥ ऐसे शोधियले मार्ग नानापरी । न येती प्रतीति मग सांडियले दुरी । आतां गाऊनि गीतीं नाचों हा मुरारी । निळा म्हणे करुं संसारा बोहरी वो ॥६॥