भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुण लावण्य संपत्ती । पांडुरंग बाळमूर्ती । सर्व सुखाची विश्रांती । चरणी लोळती महा सिध्दी

gun lavanya sampatti | pandurang balamurti | sarva sukhachi vishranti | charani lolati maha sidhdi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गुण लावण्य संपत्ती । पांडुरंग बाळमूर्ती । सर्व सुखाची विश्रांती । चरणी लोळती महा सिध्दी ॥१॥ विटे पाउलें समान । कांसे क्षीराब्धी परिधान । हात कटावरी ठेवून । तुळशीसुमन वनमाळा ॥२॥ कटीं मेखळा कटिसूत्र । उदर नाभी तें पवित्र सांठवलें बीजमात्र । नाना लोकरचनेचें ॥३॥ ह्रदयीं श्रीवत्सलांछन । पदक एकाकळीं भूषण । मुख नासीक लोचन । निढळीं चंदन कस्तुरिक ॥४॥ मुगुटीं सूर्यप्रभा झळाळ । श्रवणीं कुंडलांचे ढाळ । नेत्रीं करुणेचे कल्लोळ । निववीत भक्तजनां ॥५॥ गरुड हनुमंत सन्मुख । मुख्य सेवेचे सेवक । विराजला पुंडलीक । चंद्रभागावाळुवंटी ॥६॥ निळा उभा कर जोडून । चरणांवरी ठेऊनियां मन । तयासी तृप्तीचें भोजन । नामसंजीवनी दिधली ॥७॥