भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखोनि तें यशोदा ऐकोनि गोठी । क्रोधें संतप्त झाली पोटीं । म्हणे हा चोरिया करितां महा हाटीं । न राहेचि मी काय करुं

dekhoni ten yashoda aikoni gothi | krodhen santapta jhali potin | mhane ha choriya karitan maha hatin | na rahechi mi kay karun

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देखोनि तें यशोदा ऐकोनि गोठी । क्रोधें संतप्त झाली पोटीं । म्हणे हा चोरिया करितां महा हाटीं । न राहेचि मी काय करुं ॥१॥ किती तरी हे अपवाद । सोसूं जनाचे वेवाद । उदंड सांगताहि हा गोविंद । न सांडीचि खोडी आपुली ॥२॥ मग म्हणे तूं गोपाळा । न संडिशीचि आपुला चाळा । शिक्षा लावीन याचि वेळां । मग तूं शहाणा होशील ॥३॥ यावरी नेदीं घरात येऊं । तुजला न घाली खाऊं जेऊं । तुझिया खोडी माझा जिऊ । बहुत तपिंनला या काळें ॥४॥ मग लाऊनियां दावें गळां । नेऊनि बांधला त्या उखळा ॥ म्हणे सांडिता ऐसा चाळा । तुज सर्वथा न सोडीं ॥५॥ हांसती भोवत्या अवघ्या नारी । म्हणती करिशील आतां चोरी । नासिंले खादलें तें आजिवरी । फावलें ऐसें म्हणों नकों ॥६॥ यावरी येशी आमुचा घरां । चोरीये जरी दधीक्षीरा । तरी नेऊनियां कौसासुरा । हातीं देऊं तुजलागीं ॥७॥ ऐसें बोलोनियां सुंदरा । गेल्या आपुलिया मंदिरा । यशोदा म्हणे रे चक्रधरा । घरीं काय उणें तुज ॥८॥ निळा म्हणे बोले हरी । गोड न लागेचि तें निर्धारीं । चोरियेचेंचि आवडे भारी । करील याहिवरी चोरीया ॥९॥