भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालिले ब्राम्हण वार्ता सांगावया । शीघ बैसोनियां

chalile bramhan varta sangavaya | shigh baisoniyan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चालिले ब्राम्हण वार्ता सांगावया । शीघ बैसोनियां ॥१॥ तंव ते तिन्ही देव बाळमूर्ती धारी । मुक्ताई खेचरी आदिमाया ॥२॥ बाळक्रीडालीळें होतीं भिंतीवरी । बैसलीं सूर्यकरीं उष्ण घेत ॥३॥ तंव ते पातले वार्तिक व्दिजवर । करिती नमस्कार विनीतता ॥४॥ सिध्द आले भेटी चांगदेव समर्थ । सांगती वृतांत साष्टांगेसी ॥५॥ ऐकोनि चांगदेव आले भेटावया । उल्हासल्या बाह्या आलिंगना ॥६॥ जावें सामोरें निवृत्तिनाथ बोलती । तंव ज्ञानदेवा चित्तीं विस्मय वाटे ॥७॥ सर्वांतरवासी स्वामी सर्वगत । नभीं नभ सतत जयापरी ॥८॥ सन्मुख विन्मुख सूर्य कोणाकडे । आज्ञेचे बागडे नाचवीत ॥९॥ जेथें जावें तेथें भरुनि उरलेती । सर्वांतरी वस्ती तुमची स्वामी ॥१०॥ मग हंसूनि तयासी म्हणती निवृत्तीनाथ । वदलासी यथार्थ सिध्दांत तूं ॥११॥ परी येथें सगुणें भेटावें । निर्गणीं तो अवघें शुन्याकार ॥१२॥ व्दैतयोग घडे निजसुखाची वृध्दी । अभेदी तो सिध्दी आपेंआप ॥१३॥ आणखी एक गुज ऐकें ज्ञानसिंधू । इंद्राचा हा बंधु मरुदगण ॥१४॥ पुत्र कश्यपाचा उदरीं दितीचा । जन्म झाला याचा पूर्वजन्मीं ॥१५॥ मातेनें याचिये मागीतला वर । व्हाव राज्यधर पुत्र माझा ॥१६॥ तोचि भोगावया आला हा वैभव । पारमार्थिक सर्व लेउनी लेणीं ॥१७॥ इंद्रादिकां पूज्य व्हावी ऐसी बुध्दि । विदयायोग रिध्दी वरेंदु हा ॥१८॥ स्वर्गवासी आला वरदें मृत्युलोका । विदयांचा आवांका सर्व अंगी ॥१९॥ चतुर्वेद वक्ता षडषास्त्रीं संपन्न । अष्टादश पुराणें मुखोदगत ॥२०॥ चतुर्वेद विदया कळा ही चौसष्टि । मंत्र सप्तकोटी विधी ज्याचे ॥२१॥ स्थान मान कळा जाणे योगसिध्दी । अष्टादषौषधी रसायनें ॥२२॥ जडया बुडवा जाणे रोगाच्या परीक्षा । पंचाक्षरी शिक्षा करीत भूतां ॥२३॥ मणी मंत्र सिध्दी तोटके वेधका । साधका बाधका विदया जाणे ॥२४॥ चतुर हरिभक्त चौदाशे वर्षांच । बहुविदया सिध्दाच्या सिध्दजनीं ॥२५॥ आर्तभूत आले भेटी लवलाहो । उचित हें आहे सामोर या ॥२६॥ णती ज्ञानदेव चलावेंजि प्राज्ञा । भिंतीशी केल आज्ञा चला म्हणे ॥२७॥ निर्जिव चाले भिंती देखे विश्वजन । धांवती ब्रम्हण पुढें सांगों ॥२८॥ तों येती चांगदेव वादयांच्या गजरीं । आरुढोनि गजावरी चवरडोली ॥२९॥ तंव सांगती वार्तिक महासिध्द आले । भिंती आळंघले चालविती ॥३०॥ ऐकूनि चांगया गलितपत्र झाला । लोटांगणी आला गडबडां ॥३१॥ घाली दंडवत उभा ठाके पाहे । भिंती चालताहे गजगती ॥३२॥ तेज सूर्यापरी चौघे भिंतीवरी । देखोनियां करी नमस्कार ॥३३॥ ऐसे शतवरी संख्या नमस्कार जाले । तंव ते पातले जवळीके ॥३४॥ विनीत चांगया देखियेली स्थिती । उतरले क्षितीं भेटावया ॥३५॥ जाली भेटी तोचि विश्रांतीचा वट । छाया घनदाट बैसावया ॥३६॥ प्रीतीच्या पडिभरें पडिलें आलिंगन । परम समाधान उभयतां ॥३७॥ आलिंगनिमिसें हदगत आपुलें । सुख निक्षेपिलें ह्रदयीं त्याच्या ॥३८॥ चांगदेवा कृपादृकष्टी अवलोकीलें । अमृताचें झालें मार्जन त्या ॥३९॥ नेणों काय केलें ह्रदयीं क्षेम देतां । विश्रवीं एकात्मता ठसावली ॥४०॥ तुटलें बिरडें पुढें जन्मावळी । मागें झाली होळी संचिताची ॥४१॥ सकळ जनयात्रा दंडाचिये परी । जैसी महीवरी पडली वस्त्रे ॥४२॥ देखोनियां भाव देव कृपामूर्ती । आलिंगन देती लहान थोरां ॥४३॥ देवासी सारिखी आले शरणागतें । दुबळी समथें उंचनिचें ॥४४॥ अनन्याचा भाव जाणती हदगत । करिती त्या सनाथ दर्शनमात्रें ॥४५॥ सकळ विश्व जन यात्रा समुदाय । आलिंगिले बाह्या पसरुनियां ॥४६॥ आनंद पिकला सिध्दाचिये भेटी अमृताचि वृष्टि अनिवार ॥४७॥ विश्रांतीसी सुख आलें जया ठाया । रुळवि त्या पायावी निढळें ॥४८॥ गर्जती आनंदे नामाच्या गजरीं । घोष तो अंबरीं न समाये ॥४९॥ नाचती नाचणी संगीत कूसरी । राग सप्तस्वरीं आळविती ॥५०॥ वाजविती वादयें करिती सोहळा । समर्पिती कळा अभ्यासिल्या ॥५१॥ सिध्दाच्या चरित्रें गर्जती पवाडे । नाचती सुरवाडे आनंदाच्या ॥५२॥ ऐसे आले अळंकापुरी इंद्रायणीतीरा । ब्रम्हानंद नरनारी लोकां ॥५३॥ म्हणती चांगदेव महा लाभ झाला । हा सद्गुरु भेटला कृपामूर्ती ॥५४॥ विधियुक्त पूजा षोडशोपचारीं । समर्पिली शिरीं पुष्पांजुळी ॥५५॥ पतित पतित तारावें पतीता । चांगा विनितता शरण आला ॥५६॥ वरदहस्त आतां मस्तकीं ठेवावा । चांगा म्हणवावा शिष्यवर्ग ॥५७॥ मग श्रीनिवृत्तीनाथें कृपेच्या सागरें । आणि ज्ञानेश्वरें सोपानदेवें ॥५८॥ निरविला चांगा मुक्ताबाईप्रती । यासी करा प्रतीत आत्मज्ञानी ॥५९॥ चांगदेवें चरणी न्यासिला मस्तक । मुक्ताबाई हस्त ठेवी माथा ॥६०॥ न कळे ब्रम्हादिकां सद्गुरुची हतवटी । कला उठाउठी निजबोध ॥६१॥ स्वरुपीं अढळ ठेली चित्तवृत्ती । इंद्रियां विश्रांति तेणें सुखें ॥६२॥ न लाविची मुद्रा कष्ट नाहीं अंगी । केला राजयोगी जिवन्मुक्त ॥६३॥ लेवविला सर्वांगी पासष्टीचा अर्थ । होऊनि कृतार्थ ठेला पायीं ॥६४॥ चांगदेव म्हणे आजिची जन्मलों । गुरुपुत्र झालों मुक्ताईचा ॥६५॥ मागील चौदाशे झाली जन्मांतरे । आजी जन्म खरें सार्थकाचें ॥६६॥ मीचि मज भासे विश्वातें वसविता । हें सद्गुरु वचनें आतां प्रतीती आलें ॥६७॥ धन्य हा सद्गुरु निवृत्ति ज्ञानेश्वरु । सोपान मुनेश्वरु मुक्ताबाई ॥६८॥ दर्शनेंचि यांच्या सवरुप साक्षात्कारु । चांगा वटेश्वरु सुखी केला ॥६९॥ मग केशवदास चांगा म्हणती ज्ञानेश्वर । तुज असो बडिवार नामाचा या ॥७०॥ हा एकोनि उत्साह सकळ प्रांतवासी । आले दर्शनासी परिवारे ॥७१॥ म्हणती सिध्द भेटी आले चांगदेव । अगणित वैभव घेऊनियां ॥७२॥ सकळ वर्ण आले पहावया चरित्र । पंचक्रोशी क्षेत्र न पुरे ठावो ॥७३॥ व्यवसायी जन आले घेऊनि सौदे माल । होईल उकल म्हणती येथें ॥७४॥ साधिले बाजार मांडिलें दुकान । पहिले तो वाण सिध्द आहे ॥७५॥ म्हणती चांगदेव करावें पूजन । दयावें निमंत्रण सर्व यात्रे ॥७६॥ त्रिलक्ष भोजनाची अइत सारिली । पूजा आरंभिली सद्गुरुची ॥७७॥ उभय तीरी दिले मंडप अपार । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥७८॥ सकळ यात्रा आणि ज क्षेत्रवासी । यावें भोजनासी प्रार्थियेले ॥७९॥ नरनारीं बाळें अवघीं लहानथोरें । प्रार्थिलीं आदरें प्रसादासी ॥८०॥ भगवदभुती दयावें सर्व भुतीं अन्न । हेंचि मुख्य पूजन सद्गुरुचें ॥८१॥ आरभिले पाक अन्नें नानापरी । शाखा कोशिंबिरी चिरयेल्या ॥८२॥ शर्करा मिश्रीत सघृत पक्कानें । षडस दिव्यान्नें सिध्द केलीं ॥८३॥ मग षोडशोपचारें पूजेस आरंभ । वेदघोषें नभ गर्जिन्नलें ॥८४॥ सिदोपंत गिरिजाबाईचें पूजन । करुनि स्तवन बहुत केलं ॥८५॥ तुमचिये कुळीं हे विश्वाचे तारक । उपजलें बाळक महासिध्द ॥८६॥ समर्पिली पूजा वस्त्रें अळंकार । संपदा अपार वोपियेली ॥८७॥ सिध्दाचें पूजन आरंभिले वोजा । मेळवूनियां व्दिजां व्युत्पन्नांसी ॥८८॥ निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई । पूजेची नवाई विश्व देखे ॥८९॥ रत्नजडित चौक्या बैसविले वरी । अर्घ्यपादयादि उपचारी पंचामृतें ॥९०॥ शतसहस्त्र विप्र भोंवताले फेरी । अभिषेक पात्रें करीं धरिलीं व्दिजीं ॥९१॥ महारुद्र आरंभ उपन्यास । अंबर मंत्रघोषं दुमदुमीत ॥९२॥ मंगळ उतुरे नाना वादयांचा गजर । घोषें अवलोकिती चरण दृष्टी ॥९५॥ नानापरिमळ द्रव्यें गंधाक्षता माळा । जडित पदकें गळां समर्पिली ॥९५॥ सुवर्ण तंतु वस्त्रें मुकुटादि अलंकार । लेववीले परीकर चांगदेवें ॥९६॥ मुद्रिका भूषणें जडितांचि कुंडलें कटी सूत्र सुदले वाळे वाकीं ॥९७॥ नाना सुमन हार घालूनियां कंठी । अवलोकुनी दृष्टी भरुनियां ॥९८॥ विसन्न चांगया जाणे विधी मार्ग । पूजा केली सांग उपचारेशीं ॥९९॥ पूजेचे आसनीं विराजल्या मूर्ती । झाली धुपारती आरतीया ॥१००॥ सुवर्ण दक्षिणा गौदाना दिधली । पूजा सांग केली सद्गुरुची ॥१॥ पहाती लोचनी नरनारी बाळें । आणि नाचती कल्लोळें प्रेमाचिया ॥२॥ जवादी कस्तुरी बुक्याचे धुसर । उघळती अपार देवावरी ॥३॥ नैवेदय पुष्पांजली केल्या प्रदक्षिणा । सकळां ब्राम्हणां पूजीयेले ॥४॥ हरिभक्त वैष्णव पूजिले आदरें । वादयें मंगळतुरे घोष ध्वनि ॥५॥ व्यवसायी जन यात्रा पूजीयेले क्षेत्रवासी । दिधलीं सवसिणीसीं हळदी कुंके ॥६॥ चांगदेवें मग पोटया सुंदर जानु जंघा ॥८॥ उदर त्रिवळी प्रशस्त वक्षस्थळा । शोभली निर्मळ उटी अंगी ॥९॥ सरळ भुजादंड तुळशीपत्रें माळा । नानापुष्पें गळां डोल देती ॥१०॥ हनुवटी चुबुका दंत हिरीया जाती । दुबाही पंगति विराजली ॥११॥ नासिक सरळ उन्मलीत नेत्रकमळ । शोभल्या कळाळीं गंधाक्षता ॥१२॥ जावळ कुरळमंडीत मस्तक । पूजा ब्रम्हादिक समर्पिती ॥१३॥ मुक्ताई मुक्तरुप मुक्तीची चित्कळा । नित्य मुक्तलीळा दावी अंगी ॥१४॥ अर्ध्यापादयादिक वेदाच्या सुस्वरी चांगदेव करी ध्यान पूजा ॥१५॥ धन्य तो दिवस नैवेदय अर्पिला पुष्पांजुली केला प्रणीपाता ॥१६॥ पूजिले ब्राम्हण विधी अपचारें । हरिभक्त आदरें यथोचित्ता ॥१७॥ बैसविल्या पंगती इंद्रायणी तीरीं । पात्री नानापरी विस्तारिल्या ॥१८॥ दिव्यान्नें परवडी अन्नशुध्दी वाढिली । मंत्रे प्रोक्षीयेलीं त्रिपदेच्या ॥१९॥ सोडिला संकल्प झालों निर्विकल्प । निराशिलें पाप संदेहाचें ॥२०॥ तदर्पण केलें ज्ञानेश्वर नामें । भोजनें संभ्रमें सारियेलीं ॥२१॥ एक एक शीत व्दिजमुखीं अर्पिता । शतक्रतू भोक्ता नारायण ॥२२॥ ऐसा ये क्षेत्रींचा अदभुत महिमा । वर्णी निरुपमा चांगदेव ॥२३॥ मग समर्पिले विडे दक्षिणा उपचारीं । चांगदेव करी नमस्कार ॥२४॥ मंत्राक्षता व्दिजीं अर्पियेल्या शिरीं । राहो कल्पवरी क्षेत्र महिमा ॥२५॥ मग बैसवोनि पंगती परिवार आपुला । शेष प्रसाद घेतला चांगदेवें ॥२६॥ अदभुत सोहळा हरीचीं कीर्तनें । वांटियेलीं धनें याचकांसी ॥२७॥ सकळांसी तृप्ती याचेनि दर्शनें । करीती स्तवनें नारीनर ॥२८॥ प्रत्यक्ष पंढरी ते हे अळंकापूर । मुक्तीचें माहेर उपासका ॥२९॥ निर्विकार जन सकळ क्षेत्रवासी । पूजिती सिध्दांसि नित्यकाळ ॥३०॥ धन्य पंचक्रोशी धन्य क्षेत्रवासी । धन्य जे यात्रेसी येती लोक ॥३१॥ ऐसा चांगदेवें स्तुतीवाद केला । आणि मस्तक ठेविला चरणांवरी ॥३२॥ याचि जन्में बहुत जन्मा निवारीलें । वंदितां पाउलें सद्गुरुचीं ॥३३॥ बहुतेक विदयांचे बहु गुरु आहेती । परी ते तुळणे येती सद्गुरुचे ॥३४॥ ज्याचिया प्रसादें पावलो हा बोधू । समूळ मायाकंदू तोडियेला ॥३५॥ निजानंद पदीं स्थापिलों सतत । केला जीवन्मुक्त क्षणामाजी ॥३६॥ काय उताराई होंऊं कवण्या अर्थे । अर्पितां नाशिवंतें जीवादिकें ॥३७॥ कायावाचामनें करुनि कुरवंडी । धरी तें न सोडीं चरण याचे ॥३८॥ येणें काळें सर्व लाभाचिया कोटी । लाधलों या भेटी सिध्दाचिया ॥३९॥ सकळ विदया सहित करुनि वोवाळणी । सांडीन वरुनी जीवप्राण ॥४०॥ म्हणती चांगदेव कृतकृत्य झालों । चरणीं राहिलों मुक्ताईचे ॥४१॥ या संतचरित्र ओव्या मुक्ताफळें माळा । मिरवी जो गळां आवडीनें ॥४२॥ पुढें वाचे गाये आणीका परिसवी । लाभे तो पदवी हरिभक्तीची ॥४३॥ संतांचे चरित्र आवडी जो गाये । पढीयंता तो होये विठोबांसी ॥४४॥ आवडे श्रीहरी संत आचारित । म्हणउनी तिष्ठत हरीकथे ॥४५॥ नारद प्रल्हाद पुंडलीक नामा । प्रिय पुरुषोत्तमस जीवाहुनी ॥४६॥ गोरा परसा आतां नरहरी सावता । कूर्मा आवडता पांडुरंगा ॥४७॥ निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताइ्र । चांगा मिराबाई भानुदास ॥४८॥ विसोबा खेचर जाल्हान कबीर । रोहिदास वच्छरा चोखामेळा ॥४९॥ जनार्दन एका विष्णुदास तुका । वैकुंठनायका आवडते ॥५०॥ संतोबा पवार हरीभक्त अपार । हे परम प्रीतीकर विठोबाचे ॥५१॥ या सकळांची चरित्रें श्रवणें पठणें । मुक्त वाचाऋणें झाला निळा ॥५२॥ नव्हे वाचस्पती मूढ वाचक मी । परि उदयोकर्ता स्फूर्ति ज्ञानेश्वर ॥५३॥ तिहींच हा ग्रथ पावविला सिध्दी । प्रवर्तूनि बुध्दी स्फूर्ती दिली ॥५४॥ श्रोता वक्ता तूंचि आवडीच्या भोरें । ग्रंथ अत्यादरें लिहविला ॥५५॥ नेणता प्रमेय कथेच्या अन्वया । नेणों केलें काय सामर्थ्यगुणे ॥५६॥ सत्य सत्य सत्य त्रिवाचा हें सत्य । वदविता यथार्थ तुकया सिध्द ॥५८॥ उदंड राहिलें कथीं कथिता कथनीं । वाढेल म्हणउनी ग्रंथ थोर ॥५९॥ देवाचिया चित्ता आलें तोंचि पुरे । राहिल्या विस्तारें काय काज ॥६०॥ पुढातो पुढती संतां हेचि विनवणी । बैसावें श्रवणीं करुनी कृपा ॥६१॥ ऐकूनि हें संत तोषले सकळ । म्हणती तूं प्रेमळ कळों आलें ॥६२॥ हरिप्रियाची कथा सप्रेमें वदलासी । झाला हा आम्हांसी पाहुणेरु ॥६३॥ प्रासादिक वाणी आम्हांरे रुचली । अष्टांगें निवालीं श्रवणमात्रें ॥६४॥ निळा म्हणे सुखें आनंदे निवाला । चरणासि लागला धांवोनियां ॥६५॥ ॥ इति श्रीचांगदेवचरित्रे सिध्ददर्शनअनुग्रहपूजादिउपचारकथनं नाम पंचमप्रकरणं समाप्तम् ॥