भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुडविली क्रिया बुडविलें कर्म बुडविला धर्म पाहा येणें

budavili kriya budavilen karma budavila dharma paha yenen

रचनाकार: संत गोणाई · अभंग
बुडविली क्रिया बुडविलें कर्म बुडविला धर्म पाहा येणें ।।१।। तुझिया नामाचें लागलेसें पिसें । असोनि न दिसे लोकाचारीं।।२॥ नेणों काय कळे तुवां वागविला संबंध तुटला मज नाम्याचा॥३॥ बुडविला आचार बुडविला विचार बुडविला संसार कुळासहित ।।४।। आपुलें पारिखें सर्वथा सारिखें नेणों कवणें सुखें वेडावला ॥५॥ बुडविला मोहों बुडविली ममता बुडविली अहंता मीतूंपण ।।६।। हा नेणें वेव्हार कां इंद्रियांचें सुख अखंड याचें लक्ष तुझे पायीं।।७।। बुडविली कल्पना समूळ वासना। बुडविली सेवा त्रिविध कैसी ॥८॥ हांसे नाचे प्रेमें फुंदतु । अहर्निशीं गातु नाम तुझें ।।९।। असोनि नसता केला ये संसारीं। म्यां वाहिला उदरीं तैसा नाहीं ।।१०।। गोणाई म्हणे देवा त्वां केली निरास चाळविलें उदास बाळ माझें ।। ११ ।।