भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवीं हीं गुंतली आपुल्या वचनें । निमित्तावरुन भोवंडावी

baravin hin guntali apulya vachanen | nimittavarun bhovandavi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बरवीं हीं गुंतली आपुल्या वचनें । निमित्तावरुन भोवंडावी ॥१॥ विचारुनी ऐसें बोलिेलें सकळ । वदवीं अविकळ पशुमुखें ॥२॥ तुझा याचा आत्मा आहे एक जरी । वदवी ग्यान्या तरी येचि क्षणीं ॥३॥ नाहीं तरी वृथा न करावी वल्गना । घेऊनियां पतना जावें स्थळा ॥४॥ हमणती ज्ञानदेव तुमच्याचि प्रसादें । करील घोष वेद म्हैसी पुत्र ॥५॥ कराल तें काय नव्हे धरामर । पाषाणीं ईश्वचर प्रतिमे स्थापा ॥६॥ ग्रथत्रयामाजी सांगा जी निरुता । पढावा कोणता वेद येणें ॥७॥ ऐकोनि सकळ विस्मयें बोलती । ऋग्वेदचि म्हणती पढवा यासी ॥८॥ देऊपि वरदान केली आज्ञा त्यासी । पशू प्रारंभासी करिता झाला ॥९॥ मुख्य प्रणवाच्चार काढियेला स्वर । देखोनि व्दिवर ठकावले ॥१०॥ लागली टकमक सांडलें निज धैर्या । म्हणती गेलों वांयां दुराभिमानें ॥११॥ संहिता पद क्रम उपन्यासें त्वरित । सूत्रादिनिरुक्त शिक्षा छंद ॥१२॥ अष्टाध्यायी मीमांसा अरण ब्राम्हण । मांडिलें अध्ययन जुगादीचें ॥१३॥ बोलियेला म्हैसा वेदाच्या सुस्वारी । हें सकळ व्दिजवरीं देखियेलें ॥१४॥ गळाले अभिमानें जाहले बिगलीतं । चरणीं लोळत दीनपणें ॥१५॥ म्हणती हेचि देव तिन्ही मूर्तिमंत । मुक्ताई सादयंत परामाया ॥१६॥ नेणोनियां महिमा चावळनसें जी देवा । तो परिहार आतां दयावा काय किती ॥१७॥ घडले जे अपराध ते ते करा क्षमा । अहो सिध्दोत्तमा विश्वसंदया ॥१८॥ अज्ञान गर्वित गेलों जी अभिमानें । बोलियेलों वचनें अमर्यादे ॥१९॥ सर्वी सर्व तुम्हीं सदा सर्वगत । कैंचें प्रायश्चित नित्यमुक्ता ॥२०॥ निमित्तें करुनि करितां उध्दार । जडजीवां आधार चरण तुमचे ॥२१॥ विश्वाच्या उध्दारा तुमचें अवतरण । कराया स्थापन स्वधर्माचें ॥२२॥ कळलेती यावरी विधीचे जनिते । व्यापुनी सकळांतें सगुणरुपीं ॥२३॥ ऐशीं करुनि स्तवनें करिती दंडवत । आणि मागती आज्ञेतें विनीतता ॥२४॥ घेऊनि निरोप जाती मंदिरासी । हमैसा देऊनि त्यासी पढीण म्हणू ॥२५॥ ऐकोनि अदभूत ऐसा चमत्कार । येती नारीनर नमस्कारा ॥२६॥ घरोघरीं चर्चा स्त्रियाबाळें करिती । प्राणीमात्र वर्णितीत कीर्ति त्यांची ॥२७॥ मिळोनि परस्परें विप्र अनुवादती । योग्यता हे म्हणती नकळे त्यांची ॥२८॥ आणीकही एक नवल वितलें । क्षेत्रींच्या देखिलें सर्व जनीं ॥२९॥ करिती विस्मयचर्चा तंव येरें दिवसी । श्राध्द गृहस्थासी होतें घरीं ॥३०॥ तेणें त्या चौघांसी दिधलें निमंत्रण । त्याचे पितृगण आणियेले ॥३१॥ देऊन भोजन केले स्वर्गवासी । सांगितली ऐशी मात तेणें ॥३२॥ तें सादर चांगदेवें ऐकीयेलें श्रवणी । आणखीही ब्राम्हणीं संनिधींच्या ॥३३॥ श्रवणेंचि सिध्दासी ताटस्थ्‍ा लागलें । प्रश्नी वियारिलें ज्योतिषमतें ॥३४॥ तंव तें सत्य ऐसें आलें अनुमाना । विस्मयें त्या नयनां अश्रु आले ॥३५॥ म्हणे हें तों नव्हे तपाचें सामर्थ्य । होती मूर्तिमंत देवची ते ॥३६॥ अपूर्व हे वार्ता नवलचि ऐकिली । पूर्वी नाहीं झाली नव्हे पुढें ॥३७॥ अनुतापें झाला उव्दिग्न मानसीं । पुसे ब्राम्हणासी पुढतोपुढती ॥३८॥ कोण त्यांचा ग्राम झाले किती दिवस । व्दिज म्हणे मास एक झाला ॥३९॥ इंद्रायणी तीरीं आहे अलंकापूर । तेथे निरंतर वास्तव्य त्यां ॥४०॥ पुसोनि ब्राम्हणा गेले निवासिया । म्हैसा घेऊनियां समागमें ॥४१॥ ऐकोनि चांग देवें शिष्य पाचारिलें । आणि एकांतासी गेले सांगती त्यां ॥४२॥ यावरी पूजन न करावें आमचें । सांगतो हें साचें धरा चित्तीं ॥४३॥ तंव ते विनविती होऊनि भयभीत । आज्ञा किंनिमित केली ऐसी ॥४४॥ आम्ही तों अज्ञान नेणों स्वामी सेवा । अपराध तो देवा कीजे क्षमा ॥४५॥ त्या म्हणती चांगदेव पूजेचे अधिकारी । आले महीवरी तेचि पूज्य ॥४६॥ जेवीं सूर्यवंशी अवतरतां राघव । राहिला भार्गव मागील मागें ॥४७॥ शिष्ट असतां पूज्य न दयावी आपण । आहें प्रमाण वेदशास्त्रीं ॥४८॥ घडतां अमर्यादा जावें पतनासी । भय हें मानसीं बहुत वाटे ॥४९॥ शतमख करुनियां नहूष्‍ स्वर्गा गेला परी अमर्यादें पावला सर्वत्व तो ॥५०॥ त्रिशंकू सगर ऐस सांगों किती । अमार्यादें येती पतनव्दारा ॥५१॥ तरी ते जूज्य प्रकट झाले मूर्तिमत । ऐकिलें तें सांप्रत याचि काळे ॥५२॥ नव्हती ते मानवी देवाचे अवतार । निवृत्ती ज्ञानेश्वर सोपानदेवो ॥५३॥ मुक्ताबाई आदिमाया हे जननी । केला प्रतिष्टानीं कीर्तिघोष ॥५४॥ म्हैसीपुत्रामुखे बोलविल्या श्रुती । आश्चर्य हें चित्तीं बहूत वाटे ॥५५॥ जावें भेटीलागी विचारलें मनीं । हे सिध्दी माधनीं नव्हें कोणा ॥५६॥ अनुतापें झाला संतप्त मानसीं । म्हणे सिध्दाईसी खेव आला ॥५७॥ तंव बोलती प्रबुध्द त्यासीचि आणावें । अहो मूळ पाठवावें सिध्दराया ॥५८॥ सर्व सत्ता तुम्हां आहे जी स्वाधीन । राजे प्रजाजन आज्ञेमाजी ॥५९॥ तंव म्हणती चांगदेव नव्हे हा विचार । आज्ञेचा बडिवार कोणा अंगीं ॥६०॥ वंचूनियां काळा रक्षिलें शरीर । बहुत दिस भार वाढविला ॥६१॥ परी हें सामर्थ्य नाहीं आम्हां अंगी । जावें भेटीलागीं हेंचि सत्य ॥६२॥ जन्माचें सार्थक सिध्दाचीये भेटी । होईल या तुटी संसारेसीं ॥६३॥ परी सिध्दपणा येईल उणीव । काय कीजे जीव तळमळी ॥६४॥ ते म्हण्‍ती देवा हे नव्हे सत्य वार्ता । म्हैसी केवीं वदता होईल वेदा ॥६५॥ आणि मृत स्वर्गवासी पितर कैसे येती । ते भोजने करुनि जाती हेंही मिथ्या ॥६६॥ स्वामीसी विश्वास वाटे भलतीयाचा । परी हा नव्हे साचा वर्तमान ॥६७॥ नाहीं ये वार्तेसी साक्ष पडताळा । बोलियेला वाचाळ मिथ्या व्दिजा ॥६८॥ तया म्हणती चांगदेव प्रश्न म्यां पाहिला । तोही उतरिला यथार्थ्पणें ॥६९॥ तों शिश्य म्हणती देवा प्रश्नही चुकतो । न सांपडता जातो वेळ काळ ॥७०॥ हें ऐकोनी तयांसी सिध्दद म्हणती तुम्ह मुर्ख । अरे विदया आहे चोख पढित माझाी ॥७१॥ तरि ते म्हणती जहारे प्रतिष्ठाना । आणि हें वर्तमान आणा यथातथ्य ॥७३॥ चिरंजीव सकळ क्षेत्रवासी व्दिजां । आशीवाद माझा लिहा पत्रीं ॥७४॥ नवल हें ऐकिलें रेडा बोलविला । निगमाक्षरीं केला घोष तेणें ॥७५॥ स्वर्गस्थ्‍ा पितर आणूनि जेवविले । पुनरपि बोळविले स्वर्गाप्रती ॥७६॥ साच कीं मिथ्या धाडावे लिहुनी । तें ऐकावया मनी उत्कंठीत ॥७७॥ सांगती शिष्यासी जाऊनी त्वरीत । यावे शिघ्रवत वरावरी ॥७८॥ चालिले तेथूनी सत्वचर ब्राम्हण । ते पावले पैठण गंगातीरा ॥७९॥ तीहीं ऐकोनी चांगदेवें पाठविलें पत्र । मिळाले सर्वत्र क्षेत्रावासी ॥८०॥ धूतवस्त्रावरी गाधुमाचां राशी । मांडिलें पत्रासी पूजा केली ॥८१॥ आलिंगिले पत्र कंठी दरीं शिरीं । वाचिलें समग्रीं श्रवण केलें ॥८२॥ कळला अभिप्रावो विस्मयें दाटलें । ते सिध्द आठवले बाळवेशी ॥८३॥ फुंदती गाळिती उभय नेत्रीं जीवन । म्हणती धन्य ईश तिन्ही ॥८४॥ पूर्वार्जितें होती उत्तम गोमटीं । म्हणोनि ते दृष्टीं देखियेले ॥८५॥ मग म्हणती सिध्दासी झालें हे उपश्रुत । नवल जें अदभुत वितलें येथें ॥८६॥ दिव्यक्रीडा ऐसे संत आचरीत । दिगंता धांवत वायावरी ॥८७॥ कैसी विस्तारिली आख्या दूरदेशीं । आश्चर्य हेंचि मानसीं बहुत वाटे ॥८८॥ सन्मानुनी ब्राम्हणां दीधलें भोजन । वस्त्रें पांघरवून गौरविलें ॥८९॥ दिधली दक्षिणा मार्गी खर्चावया । पत्र लिहूनियां दिलें हातीं ॥९०॥ परात्परा सिध्दा गुरुसी नमन । पत्र अवलंबन केलें स्वामी ॥९१॥ विदयार्थी ये आम्ही सर्वही ब्राम्हण । झालो सुखसंपन्न आशीर्वादें ॥९२॥ ऐकिले जे वार्ता सत्य विपली येथें । पढविलें पशूनें वेदघोषें ॥९३॥ गृहस्थाचे पितर आणुनी जेवविले । प्रत्यक्ष पाहिलें आपण नेत्री ॥९४॥ निवृत्ति ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान । वय तों लहान बाळवेषी ॥९५॥ करुनि ऐसी क्रीडा येथुनी स्वार झाले । नेवासिया गेले महासिध्द ॥९६॥ तया स्थळी केला भगवदीता अर्थ । दहा सहस्त्र ग्रंथ सिध्द झाला ॥९७॥ बाबाजीपंतांनीं स्वहस्तें लिहिला । परी ओंवीबध्द केला ज्ञानेश्वरीं ॥९८॥ सच्चिदानंदबाबा ठेवियेलें नांव । शिक्षापिला भाव देखोनियां ॥९९॥ एक पशु दुजा सच्चिदानंदबाबा । शिष्य केले नभा नकळती ॥१००॥ येथूनियां जातां अळंकापुरीसी । पशू आळियापाशीं स्थापियेला ॥१॥ अजान वृक्ष तेथें ठेवियेली खूण । झालें निरुपण निवेदिलें ॥२॥ घेऊनियां पत्र व्दिज आले तप्तीतीरा । नमिलें वटेश्वरा चांगयासी ॥३॥ करुनि नमस्कार पत्र दिलें हातीं । नवलावो सांगती देखिले तो ॥४॥ म्हणती सत्य देवा अदभुत चरित्र । वर्णिती सर्वत्र तेथिंचे जन ॥५॥ वाचिलीया पत्र म्हणती चांगदेव । वार्ता अभिनव नित्य नवी ॥६॥ विचारितां दिसे नव्हें सामान्य । गेला अभिमान गळोनियां ॥७॥ कायरे अतिक्रम करविला मज हातीं । फिटली असती भ्रांती पाहोनि त्यांते ॥८॥ आतां तरी जावें म्हणती अलंकापुरा । सामग्रीया करा सिध्द वेगीं ॥९॥ तंव शिष्यजन सर्व गृहस्थ मिळाले । सकळीं प्रार्थिले म्हणती देवा ॥१०॥ सिध्दाई कोणाची नाहीं स्थिरावत । तपाचें सामर्थ्य वेंचलीया ॥११॥ आहे नाहीं आतां त्याचें सिध्दपण । धाडा विचक्षण पाहोनि येती ॥१२॥ मग तैशासारिखा करावा विचार । येणे येरझार चुके देवा ॥१३॥ मग पाचारिले प्रौढ वृध्द तपोराशी । जा म्हणती तयांसी अलंकापुरा ॥१४॥ वसती सिध्द तेथें निवृत्ति ज्ञानेश्वर । सोपान मुनेश्वर मुक्ताबाई ॥१५॥ सिध्दपण त्यांचे आहे कीं वेंचलें । तें पाहोनि यावें वहिलें वेगावत ॥१६॥ ते म्हणती स्वामीया संताचें लक्षण । काय कैसी खूण सांगा आम्हां ॥१७॥ वर वेषा आम्हीं पाहावें तें काय । अंतरीचें नव्हे विदयमान ॥१८॥ गृहस्थाश्रमीं एक उदास दिसती । एक ते भासती व्यवसायीसे ॥१९॥ एक वेडे मुके पंगु मुद्राहीन । चतुर व्युत्पन्न दिसती एक ॥२०॥ देहाच्या संबंधें दिसे देहाकृती । अवस्थाही भोगिती यथाकाळें ॥२१॥ निद्रित निजेमाजी जागोचि जागृतीं । स्वप्न्रींहि देखती नानाविध ॥२२॥ इंद्रियां वर्तविती स्वभावव्यापारीं । दिसती संसारी अतिदक्ष ॥२३॥ बाळक कौमार वृध्दाप्य तारुण्य । दिसती लौकिकासारखेची ॥२७॥ न चोजवे आम्हां संतांचीं निज खूण । सांगावें लक्षण तेंचि पहों ॥२८॥ आंगे संत तोचि ओळखे संतासी । काय आणिकासी वर्म कळे ॥२९॥ म्हणती चांगदेव साच हे बोलिले । विचार न चले युक्ती तेथें ॥३०॥ कायरे करावें पूसती शिष्यांसी । ते म्हणती सिध्दासी दयावें पत्र ॥३१॥ लिहोनि पत्रिका दयावी यांचे हातीं । देऊनि हे पाहती स्थित्यंतर ॥३२॥ पत्राचं उत्तर काय देती कैसें । अर्थी अनायासें येईल कळों ॥३३॥ मग पत्र लिहावया बैसले एकांती । न चालेची युक्ति थोटावली ॥३४॥ अनामासी नाम अरुपाशीं रुप । कैसें लावूं पाप कल्पनेचें ॥३५॥ चिरंजीव म्हणों तरी विश्वात्मक । तीर्थरुप तरी बाळकदशा आंगी ॥३६॥ न दिसे पूर्वी न लभेचि अक्षर । पडियेला विचार न चले हात ॥३७॥ मग दिधली टाकुनी पत्रिका लेखणी । चित्तीं चिंतवणी पैठी झाली ॥३८॥ देखोनि सकळ प्रार्थिती सिध्दासी । कां हे दशा ऐसी विपरीत ॥३९॥ म्हणेती चांगदेवकाय रे लिहावें । मूळ न संभवे पत्रिकेचें ॥४०॥ तरी ते म्हणती देवा कोरें पत्र पुरे । दयावें अत्यादरें पाठवुनी ॥४१॥ युक्तीमाजी दिसे बरवा हा सिध्दांत । सिध्दाईचा अर्थ गूढ गुह्य ॥४२॥ घालुनियां घडी कोरें पत्र देती । आणि उत्तर म्हणती मागा त्यांसी ॥४३॥ जाऊनियां तुम्हीं यावें शीघ्रवत । करा दंडवत क्षेम सांगा ॥४४॥ चालिले तेथुनी आले शिवपीठा । वास्तव्य वरिष्ठा सिध्दा जेथें ॥४५॥ यावरि म्हणे निळा पत्राचें उत्तर । देती ज्ञानेश्वर परिसावें तें ॥४६॥ अत्यंत रसाळ आहे निरुपण । पुढील प्रकरण कसोटीचें ॥४७॥ ॥ इति चांगदेव चरित्रे पत्र प्रेषणंनाम तृतिय प्रकरणं ॥