भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरवी आजी हे जोडी झाली । तुमचीं पाउलें देखिलीं । अवघींच इंद्रियें निवालीं । आलिंगनीं तुमचिया

baravi aji he jodi jhali | tumachin paulen dekhilin | avaghinch indriyen nivalin | alinganin tumachiya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बरवी आजी हे जोडी झाली । तुमचीं पाउलें देखिलीं । अवघींच इंद्रियें निवालीं । आलिंगनीं तुमचिया ॥१॥ वदनीं आठवलें नाम । तुमचें सांपडलें प्रेम । बरवा साधला हा नेम । मनही विश्राम पावलें ॥२॥ बरवा पंढरपुरा गेलों । सत्सगें महाव्दारा पावलों । भीतरीं राउळां प्रवेशलों । बारवा भेटलों विठोबासी ॥३॥ तेणें पुरलें सर्वही काम । रुप डोळां वदनीं नाम । संतांचाही समागम । धणी धाय तो पावलों ॥४॥ निळा म्हणे सर्वांपरी । कृत्यकृत्य झालों हरी । तुमचा दास मी कामारी । ठेवा दारवंटा राखोन ॥५॥