भजनी मालिका
← भजनांकडे परत

आषाढी पर्वकाळ एकादशी दिन । हरिजाग्रण देवा प्रिय

ashadhi parvakal ekadashi din | harijagran deva priy

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आषाढी पर्वकाळ एकादशी दिन । हरिजाग्रण देवा प्रिय ॥१॥ निराहारे जो व्रत करी आवडी । मोक्ष परवडी त्याचे घरीं ॥२॥ व्रत आचरती हरिकथा करिती । नामघोष गाती आवडीनें ॥३॥ प्रदक्षणा तीर्थ आचरें सेविती । पूर्वज ते जाती वैंकुठासी ॥४॥ पुडलिकाचें दरुशन चंद्रभागे स्नान । विठठल दरुशनें धन्य होती ॥५॥ एका जनार्दनीं ऎसा ज्यांचा नेम । तया सर्वोत्तम नुपेक्षी तो ॥६॥