भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें वासुनी मुख अमूप । अघासुर पसरलासे सर्प । गाई गोवळे आपोआप । जाती वदनामाजी त्याच्या

aisen vasuni mukh amup | aghasur pasaralase sarpa | gai govale apoap | jati vadanamaji tyachya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसें वासुनी मुख अमूप । अघासुर पसरलासे सर्प । गाई गोवळे आपोआप । जाती वदनामाजी त्याच्या ॥१॥ पुढे चालतां मार्ग न दिसे । अंध:कारी पडिलें ऐसें । मागे फिरावें तंव तो श्वासें । ओढूनि नेतसे पैलीकडे ॥२॥ मग म्हणती येर येरासी । प्रात:काळींचि झाली निशी । गडदे पडिले न दिसे शशी । ग्रह तारांगणे ना भानु ॥३॥ पडिलों दरकुटिमाझारी । किंवा धुई दाटली भारी । अथवा मेहुडे आले वरी । कांवांहिंचि न दिसे न तर्क ॥४॥ जाभाडीं मेळविंता आघासुर परि मागें राहिला सारंगधर । म्हणोनियां तो झाला स्थिर । तयाहि सगट गिळावया ॥५॥ तव दिवस घटिका चारी । आला चढोनियां वरी । गाई गोवळे भिन्न अंधारी । पडिलीं अघासुरा पोटीं ॥६॥ निळा म्हणें यावरी आतां । जागृत झालिया कृष्णनाथा । पुढें कैशी वर्तली कथा ते परिसावी सात्विकीं ॥७॥