भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा बहुत काळ क्रमिला क्षेत्रांत । मग धरिला पृथ्वी हेत पलाटणीं

aisa bahut kal kramila kshetrant | mag dharila pruthvi het palatanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसा बहुत काळ क्रमिला क्षेत्रांत । मग धरिला पृथ्वी हेत पलाटणीं ॥१॥ उत्तरदक्षीण मानस करावें । तीर्थां अवलोकावें आणि क्षेत्रां ॥२॥ प्रांतोप्रांतीं शिष्यसांप्रदाय आपुला । वाढवावा हा धरिला उददेश मनें ॥३॥ मना आलें तेथें समाधी बैसोनी । प्रगट व्हावें कजनीं दुजीये स्थळीं ॥४॥ सिध्दीसी खेळणें गगनेसी बोलणें । पवनेसी धांवणे अदृष्यगती ॥५॥ सत्यवाचासिध्दी मनेजयसिध्दी । प्राणज्योबुध्दी निश्चयेसी ॥६॥ सर्वही पाहिलें सवही शोधलें । सर्व अभ्यासिलें विदयाजात ॥७॥ वरिष्ठ सकळां व्याकरणीं आगळा । गायनाची कळा सप्तस्वरी ॥८॥ नृत्य करुं जाणे थैमानें संगीत । अनुकारें दावित हावभाव ॥९॥ दशावतार खेळे सोंगें नानापरी । विदया नाहीं उरी ठेवियली ॥१०॥ चौदाशें वरुर्षे काळाचा अतिक्रम । करुनि मठ आश्रम तप्तीतीरीं ॥११॥ जेवीं मोरासी सर्वांगीं विछावरी डोळे । परी एक आंधळे दृष्टावीण ॥१२॥ तयापरी विदयासिध्दीचा सोहळा । परी अपरोक्ष आंधळा आत्मज्ञानी ॥१३॥ नेणे भक्तीप्रेम सुखाचें साधन ।सीगे चढला मान सर्वज्ञेचा ॥१४॥ चौदांशे वरुषांचे सिध्द चांगदेव । स्वीकारिती भांव पूजकाचे ॥१५॥ विदयेचे मूळपीठ साधनी वरिष्ठ । स्वधर्मेकनिष्ठ व्रतधारी ॥१६॥ आरोग्य शरीर आंगी दिव्य कांती । नामें विराजती चतुर्दश ॥१७॥ चांगदेव चांगा वटेश्वर चांगा । चक्रपाणी चांगा चांगसिध्द ॥१८॥ शिवयोगीचांगा मणीसिध्दचांगा । अनकरचांगा नाहमानामें ॥१९॥ मागेश नामें चांगा । सत्येसिध्द चांगा निश्चळदास ॥२०॥ चिंधादेवी चांगा म्हणवी बुटीचांगा । चौदानामें चांगा वर्तामान ॥२१॥ राजे प्रजालोक अनुग्रहीत झाले । विदया अभ्यासिले बहुसाल ॥२२॥ सिध्दीचा साधक वास तप्तीतीरीं । पुजिती नरनारी भावयुक्त ॥२३॥ नित्य नूतन यात्रा येउनी लक्षावत । पावोनी मनोरथ फिरोनी जाती ॥२४॥ वसविले बाजार भोवतें सवदागर । विकिताती संभार केणीयाचे ॥२५॥ त्रिकाळ पूजन त्रिकाल भोजन । करिती शिष्यजन आरतीया ॥२६॥ तंव आला अतिथी पांथीक व्दिजवर । सांगे समाचार पैठणींचा ॥२७॥ देखीलें अपूर्व चरित्र लोचनीं । विस्मय तो मनीं नित्य वाटे ॥२८॥ म्हणे जी सिध्दिराया नवलाची वर्तलें । प्रतिष्ठानीं देखिलें सर्व जनीं ॥२९॥ म्हैशीपुत्रामुखें बोलविल्या श्रुती । येउनी बाळमूर्ति महासिध्द ॥३०॥ आणूनि स्वर्गवासी पितर जेवविले । ते पुढती बोळविले निजस्थाना ॥३१॥ तें ऐकोनियां सकळही धि:कारिती त्यासी । म्हणती जाला यासी बुध्दीभ्रंश ॥३२॥ कैसा हा बोलीयेला भयचि न धरितां अजागळी वार्ता अघटीतची ॥३४॥ म्हणती या मूर्खासी भोवंडा बाहेरी । पिशाच निर्धारी बरळे भलतें ॥३५॥ तंव तो म्हणे स्वामी निजनेत्रीं देखिलें । आणि तुम्हां हें वाटलें मिथ्या वाक्य ॥३६॥ तंव सिध्द म्हणती त्यासी येऊनियां जवळी । सांगावी समुळी वितली कथा ॥३७॥ न वाटेचि हें सत्य अनुमानें सांगतां । केंवी झाला वदता पशू मुखें ॥३८॥ काय त्यांची नांवे जीहीं बोलवीला । म्हैसा पढविला निगमे केंवी ॥३९॥ तरि तो म्हणे स्वामी परिसावें सादर । सांगेन सविस्तर वर्तमान ॥४०॥ तेथें चौघेंजणें बाळें अकस्मात आलीं । अंगी विराजली योगमुद्रा ॥४१॥ प्रायश्चितालागी आलीं तया स्थळा । परि दाखविली लीळा असुमाई ॥४२॥ निवृती ज्ञानदेवा सोपान मुक्ताई । नांवाची नवाई विप्रीं केली ॥४३॥ सातवें वरुष विरजे निवृत्ती । साहा वरुषांची मूर्ति ज्ञानेश्वर ॥४४॥ पांचवें वरुष सोपानदेवासी । बाळकें म्हणती नानीरगोंडी ॥४६॥ म्हणविती पतीत नाहीं वडीलधारें । पातित्य कवण्या व्दारें पुसावयासी ॥४७॥ तंव ते म्हणती स्वामी धाडिलें ब्राम्हणीं । तीहीं दिधलें लिहूनि सविस्तर ॥४८॥ मग त्या दाविती वंशावळी पत्रिका । आणि म्हणती कीजो रंकां पावन आहमां ॥४९॥ पत्र तें वाचिती सादर मानसें । ऐकती विन्यास विप्रकुळें ॥५०॥ आपेगांवकर गोविंदपंत निराई । आणि सिदोपंत गिरजाई आळंकापुरी ॥५१॥ ते श्रीगैरनीनाथाची शुध्द सांप्रदायी । परी येरयेरा नाहीं परिचय कदा ॥५२॥ त्या गोविंदपंता उदरीं वंशाचा उध्दार । उपजला कुमर विठ्ठल नामें ॥५३॥ केला व्रतबंध पढविला अक्षर । वेदातादि सारसांख्ययोग ॥५४॥ परमार्थिक ग्रंथ पाहिले गुरुमुखें । अध्यात्मी निजमुखें विराजला ॥५५॥ परम विरक्त ज्ञानाया सात्विक । ब्रम्हचर्य निष्टंक व्रत चाळी ॥५६॥ मातृपितृभक्त परम सुशीळ । नेदी अहंतामळ लागों अंगी ॥५७॥ परी जावें रामेश्वरा उत्कंठीत मनीं । मग तीर्थरुपा पुसोनि निघते झाले ॥५८॥ ब्रम्हचर्य व्रत त्रिकाळ साधन । स्त्रानअर्ध्यदान करित चाले ॥५९॥ गोदा उभय तीरें अवलोकिलीं । पुढें चालीं भीमातीरें ॥६०॥ मधुकरभिक्षा अनुतापें अथीला । तो आळंकापुरा आला अकस्मात ॥६१॥ तंप तेथें गिरजाई होते सिदोपंत । परम भागवत स्वधर्मशीळ ॥६२॥ तीहीं विठोबाची देखोनियां स्थिती । कन्या दिधली हाती संकल्पुनी ॥६४॥ करुनियां लग्न शुध्द कन्यादान । केली समर्पण रुक्माई त्या ॥६५॥ मग ते तीर्थवासु गेल रामेश्वर । करुनियां इतरा दक्षिण तीर्था ॥६६॥ सवेंची तेथुनी गेले वाराणसी । तंव ऐकिलें वार्तेसी गांविचीये ॥६७॥ गयावर्जनाचा श्रीगोविंदप्रतासी देवआज्ञा झाली । मग उत्तरकार्य करुनी गयेसी गेले ॥६८॥ गयावर्जनाचा संपादिला विधी । जाले शुध्दबुध्दी विरक्ती बळें ॥६९॥ ऋणत्रयापासुनी झाला तोहि मुक्त । मग आले ते पुनरक्त महाक्षेत्रा ॥७०॥ विरक्त मानसीं अनुतापाचें बळ । वैराग्य निर्मळ अंतरनिष्ठ ॥७१॥ मठी नृसिंहाश्रमासी जाऊनियां शरण । केलें विसर्जन गृहस्थाश्रमा ॥७२॥ सर्व प्रायश्चितें केला प्रषोच्चार । नशिले विकार साही वैरी ॥७३॥ पूर्व आश्रमाचें त्यागूनियां नाम । जाले चैतन्याश्रम सतीधर्मे ॥७४॥ शिरीं नारायण उदरीं नारायण । गायात्री नारायण सर्व संधी ॥७५॥ जनीं नारायण विजनीं नारायण । वंदनीं नारायण सर्वकाळ ॥७६॥ सद्गुरुसेवनीं राहीले सतत । ते ऐकिीयेली मात सिदोपंती ॥७७॥ करुनियां खेद उभय दंपत्य । ह्रदयीं रुक्माईतें आलिंगिती ॥७८॥ म्हणती सर्वोविसीं तुझें वो अनहीत । आम्हीचि तें नेणत केलें मूर्खी ॥७९॥ पांथिाक विरक्त आला तीर्थवासु । तो देखोनियां उदासू दिधलें तुज ॥८०॥ होणार ते बळीवंत होऊनियां गेलें । पूर्वार्जिता न चले कांही ॥८१॥ जिता अन्न तुज देऊं चीर चोळी । तुंचि आमुचे कुळीं कन्यापुत्र ॥८२॥ यावरी तुळसीवृंदावनीं पूजन । करुनि प्रदक्षिणा सारी काळ ॥८३॥ मग तेंचि दृढ व्रत धरियेलें रुक्माई । नेणे दुजें कांही सेवेवीण ॥८४॥ तव नृसिंहाश्रमासी निजस्वप्नीं दृष्टांत । झाला अकस्मात महाक्षेत्री ॥८५॥ चैतन्याश्रमासी आहे भार्या घरीं प्रतिव्रता माहेरीं मार्ग लक्षी ॥८६॥ तरी तुम्ही जाऊनियां आणावी ते येथें । आणी दयावें संन्याशातें तिचिये हातीं ॥८७॥ उभयतां एकत्र नांदवावी ऐक्यें । जंव होती बाळकें चौघे पोटीं ॥८८॥ इंद्रायणीतीरीं आहे ते सुंदरा । माजी आळंकापुरा प्रतिव्रता ॥८९॥ तरी तुम्हीं अनुमान न करितां सदथीं । जावें शीघ्रगती आणवी ते ॥९०॥ मग नृसिंहाश्रम आले आळंकापुरासी । आणी नेलें वाराणसी सिदोपंत ॥९१॥ गिरजा बाई सवें रुक्माबाई घेतली । त्या उभयां भेटी केली वधुवरां ॥९२॥ आज्ञापिलें तेव्हा चैतन्याश्रमासी । रहावें सहवासी स्त्रियेचिये ॥९३॥ जंव चवघे अपत्यें होती ईचे कूसीं । तंव तुहमी उदासी नये होऊं ॥९५॥ दंड कमंडलु घेतला हातीं । आणि केला उभयतांचा मेळा पाक ॥९५॥ करुनियां यात्रा आले आळंकापुरासी । कन्या जामातेसी सिदोपंत ॥९६॥ त्यां देखोनि प्रांती उपहासिलें बहूत जनी । म्हणती यातें नयनीं पाहों नये ॥९७॥ संन्यासी होऊनी भाग्येशी संबध । स्वप्नीं हें निषिध्द न देखावें ॥९८॥ वनिता आणी घरीं आणि बाहेरी संन्यासी । आतळतां यासी प्रंत्यवाय ॥९९॥ कामलोभी तरी कां झाला संन्यासि । नेलें पूर्वजांसी अध:पाता ॥१००॥ हरिलें शिखा सूत्र वर्ण याति गोत्रा । ग्रहदारादी सर्वत्र त्यजूनियां ॥१॥ आणी घेऊनियां पत्नी पहुडे हा शेजेसी । पापात्मा संन्यासी पापरुपी ॥२॥ विटाळ मानिती सर्वही दर्शनाचा । म्हणती हा पतीतांचा शिरोमणी ॥३॥ बुडविले स्वधर्म चतुर्थश्रमासी । इहलोक परत्रासी आंचवला ॥४॥ विटंबिली काया नासीला परमार्थ् । वेदबाह्य अनर्थ केला येणें ॥५॥ धिक् ऐसें जिणें म्हणती स्त्रियाबाळें । नेली उभय कुळें निरयवासा ॥६॥ उबगोनी षटकर्मा त्याजिलें शिखासूत्र । आणि अपंगिले कलत्र परिग्रहो ॥७॥ परि तो कोणासीहि न बोले वचन । सर्वदा लपोन वसे गुंफे ॥८॥ नैवेदय वैश्वदेव नाही स्मार्ताध्यान । श्राध्द ब्रम्हयज्ञ विवर्जित ॥९॥ तयाची संतती मुलें चौघें जणें । प्रायश्चित कोणें कैसे दयावें ॥१०॥ वडील निवृत्तह दुजा ज्ञानदेवो । तिजा सोपानदेवो मुक्ताबाई ॥११॥ वाचिलीया पत्र हांसती सकळ । म्हणती यातिकुळ नाही यांसी ॥१२॥ नव्हतें जें ऐकिलें तें नेत्रीं देखिलें । अपूर्व ही मुलें श्रीपादाचीं ॥१३॥ चतुर्थाश्रम आणि भार्येसी संबध । ऐकतां हें निषिध्द घडती दोष ॥१४॥ ठेवियेलीं नांवे बरवी विचारुनी । केलीं उपजवोनी पतित पोरे ॥१५॥ ज्ञानदेवा अर्थे ज्ञानाचा दिवस । आणि होता पतित वेष बाळकाचा ॥१६॥ यातिचिये पोटीं जन्मले पतीत । नामें विपरीत ठेवियेलीं ॥१७॥ जेविं छत्रपति म्हणती घरींच्या बाळका । परी कैंचा गज सिक्का राज्या त्यासी ॥१८॥ निवृत्ति नाम आणि प्रवृत्ति बांधला । सोपान अवघडला प्रत्यवाई ॥१९॥ मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी । ज्ञानदेवो आणि पातित्य भोगी ॥२०॥ तंव एक म्हणती होता नामापासीं काय । राजा आणि वाहे मोळया शिरीं ॥२१॥ रवी नाम आणी दधी मंथन करीत । फणी विचंरीत वनित वनिता केश ॥२२॥ इंद्रधनुष्य आणि क्षणामात्रेंची विरे । मेरु आणि फिरे माळेसवें ॥२३॥ पैल तो गे म्हैसा पखाले वाहती । आणि र्याना तया म्हणती विश्वजनीं ॥२४॥ म्हैसीपुत्र आणि नामें म्हणती ग्याना । तरी काय तो हाईन प्रज्ञाशीळ ॥२५॥ हे ऐकोनि ज्ञानदेव बोलती तयांसी । होती ज्ञानरासी आत्मा माझा ॥२६॥ आज्ञानासी ठावो नाहींची पाहतां । विचारावें आतां देईल साक्ष ॥२७॥ म्हणती व्दिज हे पूर्णाची बोलणी । बोलती वायाणी मूर्खे पोरें ॥२८॥ उपवासी उदार देती णाल्या ऐसे । परि ते फोस कजैसें भुकेल्याचें ॥२९॥ श्रीपाद बोलता ऐकिलीं जीं वचनें । तेची धरुनि मने बैसलीं हे ॥३०॥ कुपथ्य हें यासी झालें सर्वोपरी । प्रायश्चित्तावरी पडिला धोंडा ॥३१॥ वासुदेव सर्वांभूतीं हे बोलती । परी बहुत जन्माते प्रतीती ज्ञाननिष्ठे ॥३२॥ शुका सनकादिकाचे हे स्वानुभव द पावती मानव कैशापरी ॥३२॥ शुका सनकादिकाचे हे स्वानुभव । पावती मानव कैशापपरी ॥३३॥ शब्दज्ञानी सर्वहि कथनीं हेंचि कथिती । परी तैसा न पवती स्वानुभव ॥३४॥ ऐशा करुनियां खीक्या धि:कारें बोलती । नाश केला म्हणती वृथा ज्ञानें ॥३५॥ पुसा यासि कैसा तुझा आत्मा पशू । हा दावी सौरसु बोलिल्याचा ॥३६॥ त्याचीया ताडणें तुज येती वेदनपा । कीं पावसी घातना त्याच्या घातें ॥३७॥ हा दाविशी चमत्कार तरी तूं ज्ञानेश्वर । ऐसें व्दिजवर बोलियेलें ॥३८॥ म्हणती ज्ञानदेव संदेह निरसावा । म्हैसा आणवावा जवळीके ॥३९॥ मग आणूनि टोणगा मारिती शिपुटी । तव तोचि उठी ज्ञानदेवा ॥४०॥ देखोनि आश्चर्य येरयेरां दाविती । आसुमाई हें म्हणती नवल थोर ॥४१॥ बोलिल्या सारखी कर्तृत्वाची शक्ती । आंगी तोचि विभूति ईश्वराची ॥४२॥ उदंडें बोलतो हावभाव दाविती । परी ते प्रतिष्ठाची मिरविती ॥४३॥ आजी हें अपूर्व देखिलें लोचनीं । जें परदु:ख लेऊनि दाविलें अंगी ॥४४॥ तंव ते कुटील म्हणती हे सर्व ही बाजीगिरी । दावितीती परी विदयाचिया ॥४५॥ गौड बंगाली हे विदया प्रसिध्द । शिकवूनि प्रबध्द केलीं पोरें ॥४६॥ चतुर्थाश्रमांत करिती तीर्थाटणें । शिकला टाणेटोणे क्रियाभ्रष्ट ॥४७॥ पतीत संन्यासी पत्तिताचे मंत्र । पढविलें अपत्रि अर्भकांसी ॥४८॥ सर्वांविशीं तेणें नाश केला यांचा । जें प्राश्चित वाचा न वदे श्रुती ॥४९॥ गुरु आज्ञेवरी हाकऊनि सोकाळ । लावियेला विटाळ चतुर्याश्रमा ॥५०॥ अभिचार पूजा कापटयाचीं बीजें । घोकविलीं बोजें मूर्खा पोरां ॥५१॥ या अर्भकांसी थार नाही ऐसी केली । आणि उभकुळें नेलीं पतनव्दारा ॥५२॥ तंव सात्विक प्रबुध्द बोलती तयांसी । नये गुणदोषी चित्त ठेवूं ॥५३॥ दीक्षादानी ऐसे भासती लोचनीं । पैशून्य वचनीं काय काज ॥५४॥ न कळेचि महिमा कदाहि कोणचा । नये बोलों वाचा हेळसुनी ॥५५॥ जानकी स्वयंवरीं श्रीराम बाळरुप । भंगूनियां चाप पर्णिली सीता ॥५६॥ बटूरुपी वामन तीन पादभूमी । मागोनि आक्रमी अवनी सर्व ॥५७॥ तैसाचि प्रल्हाद दैत्याचिया वंशी । झाला वैष्णवांशी अग्रगण्य ॥५८॥ मर्कट योनीसी जन्मला हनुमंत । प्रताप अध्दूत आंगी त्याचे ॥५९॥ घटामाजी जन्म आणि प्राशिला सागर । पहा तो व्दिजवर अगस्तीमुनी ॥६०॥ असो हें न झांके सुवर्ण कसवटी लावितां । भानू आच्छादितां अभ्रछाये ॥६१॥ याहिवरी यासी युक्ति एकी आहे । जेणें नि:संदेह फिटे भ्रांती ॥६२॥ जरी हा बोलवील पशु निजमुखें । तरी याचे श्रुतिकें आत्मज्ञान ॥६३॥ तरी मानूं म्हैसा याचा आत्मा खरा । करुं परिहारा दोषमुक्त ॥६४॥ ऐकोनियां सकळ मानवले व्दिज । म्हणती हेचि वोज बरवी युक्ति ॥६५॥ येहवी पध्दती नाहीं ग्रंथांतरीं । प्रायश्चित्तावरी वचन याच्या ॥६६॥ यतीधर्मामाजी पत्नी आपंगिली । नाहीं हे ऐकिली शिष्टाचारीं ॥६७॥ कैचें प्रायश्चित्त श्रीपादाच्या पोरां । कीजे परिहारा दंडूनि दोषां ॥६८॥ न करवे सर्वथा याचा अंगिकार । बरवा हा विचार काढियेला ॥६९॥ वरी म्हणे निळा पुढीलीये प्रकर्णी । वेद घोषे वाणी गर्जेल पशू ॥७०॥ ॥ इति श्री चांगदेव चरित्रे ज्ञानेश्वर जन्मकर्म निरुपणं व्दितिय प्रकरणं समाप्त ॥