भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्ण सकळा जीवांचा जीव । जाणते जाणती तयाचा भाव

krushna sakala jivancha jiv | janate janati tayacha bhav

रचनाकार: संत बोधले · अभंग
कृष्ण सकळा जीवांचा जीव । जाणते जाणती तयाचा भाव । इतरां लोकां संदेहो न कळे । महिमान तयाचा ॥१॥ आपण तो बाळ ब्रह्मचारी सकळ । जन्मले तयाचे उदरी ब्रह्ममाया न कळत । याची थोरवी येर लोक काये जाणती ॥ २॥ हा तो सर्वांचा साक्षभूत । कोणा न कळे याचा अंत आता सांगेन तयाचा वृतांत । सावधान श्रोते हो ॥३॥ कृपा आपणाची नारी आपण वर्त देह परी । दोनी दावी जनाचारी आपण यकटचि एक ॥४॥ आपण एकलाची एक सर्व । सोळा सहस्त्र गोपाळ । गोपिकांसहित खेळे । तरी न कळे चरित्र ॥५॥ आता सांग न कृष्णाची मूळ कथा । आपणचि माता आपणचि पिता । आपण जाला चरित्र करिता । कंसारि कान्हया ॥६॥ आपण चौवर्णाचे मूळ । आपण ब्रह्म ते केवळ । विश्वी विस्तारला रे सकळ । चहू वेदांची कळ तयापासी ॥७॥ साही शास्त्रे झगडती । आठरा पुराणांची वित्पत्ती । परि न कळे तयाची गती । आपण श्रीपती खेळतसे ॥८॥ आपण तो पांडवांचा सोईरा । धावे ब्रह्मी द्रुपदिच्या कैवारा । दुष्ट दुर्योधन विरा । साहे नव्हे सर्वथा ॥९॥ पांडवालागी आपण । कृष्ण साहये होये सावधान । सत्य तयाचे देखोन । उणे येऊ नेदी सर्वथा ॥ १०॥ पाचही पांडव समूळ । आता सांगेन तयाचे मूळ । हे तो पंडू चे पुत्र केवळ । कृष्ण साहये होये तयासी ॥ ११॥ जो च आपला स्वधर्म तोच धर्म रे जाण । मग अनुभवाची खुण सांगतो ऐका ॥ १२॥ भीम तोची भावबळी । या अगाध पाहाहो योगियाचा रावो । तोची एकु ॥ १३॥ आर्त तोचि अर्जुन सबुध ते सुभद्रा जाण गुरुपुत्र जाणती हे खुण । इतरा न कळे जाण सर्वथा ॥ १४॥ अवलोकी तोचि न कुळ । सादृष्ट तो सहदेव । पाचाची प्रीत द्रुपदी पहावो । अवलोकिता ठावो सन्निधचि असे ॥१५॥ सत्य तेचि सीता स्वये । आत्माराम लक्ष्मण बंधु सवे ॥ १६॥ राम तोचि रावण दुर्बुध्दी दुर्योधन । असता जवळी जाण म्हणता दुरी । बोधला म्हणे जेथिले तेथेच आहे । ज्ञानदृष्टी पाहे परतोनिया ॥१७॥