भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलें वारकरी करिती जयजयकार

alen varakari kariti jayajayakar

रचनाकार: संत भानुदास · अभंग
आलें वारकरी करिती जयजयकार । गरुडटके भार असंख्यात ॥१॥ त्या सुखाचा पार जाणें तोचि एक । भक्त पुंडलिक भाग्यवंत ॥२॥ प्रेमे महाद्वारी घालुनी लोटांगण । देती आलिंगन एकमेंकां ॥३॥ निडारले नयन पीतांबरधारी । देखिले विटेवरी पांडुरंग ॥४॥ शिवणी सासुरवासी माउली देखे । तये चित्त पोखे जीवनकळा ॥५॥ तैसें तें श्रीमुख देखोनि निवालें । आलिंगना निघाले लवडसवडीं ॥६॥ विटेसहित मिठी घातलीसे पायीं । शरीरीं शुद्धी नाहीं मीपणाची ॥७॥ अनंता जन्मीचे विसरलों संताप । विठोबा मायबाप देखियेला ॥८॥ एक म्हणती स्वामी देवा दीनवत्सला । कृपेचा कोंवळा पाडुंरंग ॥९॥ म्हणती कूर्मदास आर्त करुनियां । तुम्हां भेटवाया बोलाविलें ॥१०॥ माझिये हातींचा चरणीं माथा ठेवा । निरोप सांगावा पंढरीनाथा ॥११॥ कृपेचा कोंवळा दीन दयानिधी । येऊनि मज आधीं सांभाळावें ॥१२॥ नाहीं कर चरण न घडे दर्शनें । मन आहे शरण तुमचे पायीं ॥१३॥ चातक जलधरा चिंतितां मानसीं । चकोर चंद्रासी भावें जैसा ॥१४॥ तैसी मनीं आवडी उचलली तुंतें । ध्यातसे तुमचें देवराया ॥१५॥ स्मरे वत्स जैसें माउली लागुनी । पिलीं ते पक्षिणी लागीं जैसीं ॥१६॥ तैसा मी तुमतें चिंती वेळोवेळां । देखावया डोळां चरण स्वामी ॥१७॥ गोत वित्त धन मज नाहीं आधारु । तुमचा निर्धारु आहे देवा ॥१८॥ करुणासिंधु ऐसें म्हणवितां जनीं । येऊन मजलागुनी सांभाळावें ॥१९॥ अनाथांचा नाथ सर्वज्ञाचा रावो । जाणसी निजभावो अंतरींचा ॥२०॥ ऐसें कूर्मदासेंविनविलें आहे । अहर्निश पाहें वात तुझी ॥२१॥ ऐकोनी पंढरीराव झाला उत्कंठित । केव्हा तो निजभक्त आलिंगीन ॥२२॥ अंतरीचें मनोरथ होती परिपुर्ण । उल्हासाती नयन देखलिया ॥२३॥ भक्त इष्टमित्र भक्त सुखसिंधु । भक्त आर्तबंधु थोर मज ॥२४॥ बोलाविला नामा आणि ज्ञानदेवो । सांगतला भावे तयाप्रती ॥२५॥ आर्तें करुनी वात पाहातसे कुर्मा । बोलाविलें आम्हां भेटीलागीं ॥२६॥ जाऊं समागमें तुम्ही आम्हीं तेथ । करणें सनाथ भक्तराया ॥२७॥ म्हणोनी दोघाजणां धरुनियां हातीं । चालिले श्रीपाति चरणें चालीं ॥२८॥ महिमा ज्ञानदेवो अहो जी पूर्णकामा । जाणा तुमचा महिमा तुम्ही देवा ॥२९॥ करता करविता सर्व तुझी सत्ता । सकळांची चाळीता चित्तवृत्ति ॥३०॥ नामदेवें चरणीं ठेवियेला माथा । बरवें दिनानाथा विचारिलें ॥३१॥ संतांचें दर्शन होईल संयोग । निवतीं अष्टांग चरण स्पर्शें ॥३२॥ विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं । दाटलें हृदयीं करुणाभरतें ॥३३॥ जातां मार्गीं भक्त देवाचा आवाडता । होता तो सांवता जीवन्मुक्त ॥३४॥ त्यांचे सुख घ्यावें म्हणोनि माव केली देवें । कौतुक दाखवावें नामयासी ॥३५॥ तयांप्रती काय बोले केशवराज । लागलीसे मज थोर तृषा ॥३६॥ नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळीयाभीतरीं देव गेला ॥३७॥ तंव तो परमानंद बोधे नित्य तृप्त । केलेविण करीत न ये काया ॥३८॥ माथा ठेवोनि हात केला सावधान । दिधलें आलिंगन चहूभुजीं ॥३९॥ देखोनियां मिठी घातली चरणीं । वोसंडलें नयनी प्रमजळे ॥४०॥ करितसे विनवणी स्वामी चक्रपाणी । जनक जननी तुंचि माझी ॥४१॥ तुंचि माझे सर्व वैभव गौरव । हृदयींचा भाव जाणसी तुं ॥४२॥ चरणीं ठेउनी माथा विनवितसे सांवता । बैस पंढरीनाथा करीत पूजा ॥४३॥ म्हणती देवराज कैंचे पूजन तुझें । राख राख माझे प्राण आतां ॥४४॥ तस्काराची मांदी लागलीसे पाठीं । चुकवीं त्याची दृष्टी लपवीं मज ॥४५॥ कोठें तुज लपवुं अगा सगुणरुपा । माझ्या मायाबापा पाडुंरंगा ॥४६॥ ऐसा कोणरिता ठाव न दिसे मज । तेथें तुझें तेज झांकोळेल ॥४७॥ बाहेर भीतरीं तुझाचि प्रकाश । गगनासी अवकाश तुझे पोटीं ॥४८॥ मग कटीचें खुरपें सत्वर काढिलें । हृदय फाडिलें तत्क्षणी ॥४९॥ यावें पंढरीनाथा रिघावें भीतरीं । सुखरुप निर्धारी रहावें येथें ॥५०॥ बैसोनियां देव ह्रुदयसंपुटीं । करी सुखगोष्टी स्वभक्तासी ॥५१॥ एवढ्या उपकारा काय तुज द्यावें । कैसें तुज व्हावें उतराई ॥५२॥ अवघा मीचि घेई अवथा मीचि घेई । यापरतें कांहीं न दिसे मज ॥५३॥ तंव म्हणे सांवता जीवाहुनि परता । न करीं तुं चिंता विठ्ठलास्वामी ॥५४॥ नामदेव मनीं करीतसे चिंतनी । नयेचि अझूनि विठ्ठल माझा ॥५५॥ वाट पाहता बहू वाडवेळ झाला । कोठें गुंतयेला स्वामी माझा ॥५६॥ माझा पांडुरंग सर्व सुखधन । दाखविला कोण प्राणसखा ॥५७॥ अवस्थे भरे प्रेम बहुअ आसे स्फुंदतु । विठ्ठल विठ्ठल म्हणतु वेळोवेळां ॥५८॥ अदेह जातो चाचरी भेटीलागीं आर्त । पाउलें उमगीत विठोबाची ॥५९॥ तृषाक्रांत कैसें जीवनातें गिवसी । कीं बाळ मातेसी क्षुधातुर ॥६०॥ हरिणीचे पांडस चुकलें हरिणीसी । जैसेंअ दाही दिशा पाहे देखा ॥६१॥ पाझर सुटला दृष्टी वोसंडला पोटीं । हृदय तें पिटीं करकमळीं ॥६२॥ देह टाकी धरणीं नामाचे बोभाटी । म्हणे देई भेटी प्राण जातो ॥६३॥ सांडोनि जातोसी ऐसें जरी जाणतें । तरी कां विसंबतें तुजलागीं ॥६४॥ मिठीं पीतांबरी घालुनी मुरारी । येतो चरणावरी रुळत सरसा ॥६५॥ ऐसें विलपत अंतर अवस्था । देखिला सांवता सुखराशि ॥६६॥ चरणीं घालुणी मिठी पुसतसे मातु । माझा पंढरीनाथु केउता गेला ॥६७॥ तो विसरला देहभावा आर्तभुतमनें । होउनी संधानें हरिच्या रुपा ॥६८॥ प्रेम उंचबळतु आनंदे डुल्लतुअ । वाचेसी जपतु रामकृष्ण ॥६९॥ देखोनि त्यांची स्थिती विठ्ठल माझा आहे । त्याजपाशीं पाहे पुढतोपुढती ॥७०॥ त्यांचे पुर्ण सुख देखियलेंमनें । हर्षयुक्त चिन्हें याचे देहीं ॥७१॥ मज दुबळ्याचा ठेवा गिळियेला तुवां । सुखाचा विसांवा पंढरीराव ॥७२॥ क्षणभरी दाखवी धरीन मी जीवीं । जाताती वांचवीं प्राण माझे ॥७३॥ वेंगी मजसी भेटे करी सुख गोष्टी । म्हणे करीन भेटी विठोबाची ॥७४॥ तेचि शकुन गांठी बांधली पालवीं । माझ्या माथां ठेवीं अभयकर ॥७५॥ ऐकोनि पंढरीनाथ म्हणे सांवत्यांतें । मज माझ्या नाम्यातें भेटी करें ॥७६॥ शिणलें बाळक होत कासाविसी । दिसतें परदेशी मजवीण ॥७७॥ मग म्हणे सांवता परिसी हरिभक्ता । कृपा पंढरीनाथा आली तुझी ॥७८॥ म्हाणोनि उतावेळ झाले कमळापति । भेटोनि विश्रांति द्यावी मज ॥७९॥ जवळींच देखनी सावधान पाहे । देती पंधरीराय आलिंगना ॥८०॥ न कळेअ तुवांकाय केल्या पुण्यराशी । वाटे भजिन्नलासी सर्वांभूतीं ॥८१॥ जेणें सुख पावोनि माझा पंढरीनाथ । झाला वेळाईत तुजलागीं ॥८२॥ खांदी गरुड टका घेऊनी निरंतरीं । चालविली वारी पंढरीची ॥८३॥ संतचरणरज वंदियेले माथां । म्हणोनि पंढरीनाथा आर्त तुझें ॥८४॥ दशमी दिंडीपुढें नाचती बागडे । गाईल साबडें हरीचें नाम ॥८५॥ तेणें पंढरीनाथा वाटला आनंदु । मग तो कृपासिंधु बोलला तुज ॥८६॥ कायावाचामनें होऊन तल्लीन । केलें हरीकीर्तन एकादशीं ॥८७॥ तेथें तिष्ठत होता पंढरीचा रावो । प्रसन्न हा देव झाला तुज ॥८८॥ अनंत जन्मींदेह कर्वती घातले । कां उग्र तप सांधिलें महातीर्थीं ॥८९॥ परोपकारी प्राण वेंचियेला तुवां । पंढरी येतां केशव धाला तेणें ॥९०॥ आतां तुझें भाग्य महिमा तोअ अद्भुत । जाणें पैं समर्थ पंधरीराव ॥९१॥ म्हणोनियां चरणीं ठेऊंनियां माथा । गहिंवरें सांवता भक्तराज ॥९२॥ प्रेमें आलिंगन झालें उभयतां । मग झाला बोलता विष्णुदास ॥९३॥ सुखाचा सोयरा तुंचि या तत्त्वता । माझा प्राणदाता भक्तराज ॥९४॥ सांगितला शकुन साच करी वहिअला । मज माझ्या विठ्ठला भेटी करीं ॥९५॥ आतां मज धीरु न धरवे सर्वथा । स्फुंदता हे अवस्था चित्त माझें ॥९६॥ कडप्याचे खुरपे काढुनिया येरे । हृदय फाडिलें तये वेळीं ॥९७॥ तंव तो पाडुरंग निघाला बाहेरी । नामा पाय धरी धाऊनियां ॥९८॥ येरें संबोखुनी पितांबर आंचळें । पुसलें मुखकमळ नामयाचें ॥९९॥ देउनि आलिगन हांसे पांढरीनाथ । पुसतसे वृत्तांत काय झालें ॥१००॥ येरे तंव मिठी घातली चरणीं । म्हणे जनकजननी तुंचि देवा ॥१०१॥ कवण्या मोहे माझे पाळिसी तुं लळे । हें मज न कळे केशवराजा ॥२॥ भेटोनियां मातें म्हणे ज्ञानदेव । कूर्माही पहावो लवलाही ॥३॥ तरीच माझ्या मना वाटे समाधान । निवती लोचन देखिलिया ॥४॥ भेटीचें पैं आर्त आहे माझे मनी । चाल वेगें करुनि करुणारसे ॥५॥ आनंदाचा मर्ग संताचे संगतीं । आनंदें नाचती पांडुरंग ॥६॥ स्फुरती भुजा दंड आणि वक्षस्थळ । सुखाब्धी मिळेल मना आजी ॥७॥ नामा ज्ञानदेव नवल करिती कैसें । कूर्म्याचें पैं ऐसें प्रेम देवा ॥८॥ वोसरली धेनु वत्सालागीं जाय । तैसें पंढरीराय चालियेले ॥९॥ लवताती लोचन स्फुरताती बाहे । येती माझी माय भेटीलागीं ॥११०॥ आला पंढरीराव कूर्मा घाली लोटांगण । दिधलेम आलिंगन चहुभूर्जीं ॥११॥ पडियेली मिठी न सोडी सर्वथा । मीळाला पंढरीनाथा सद्भावेसी ॥१२॥ कूर्मा म्हणे माझे थोर भाग्य आतां । म्हणोनि पंढरीनाथा भेटी तुझी ॥१३॥ तरीं आतां तुवां न जावें येथुनी । जोडला चरणीं स्थिर राहे ॥१४॥ देव आणि भक्त एकरुप झाले । मग दोघे आले आश्रमासी ॥१५॥ देव म्हाणे भक्तां कष्टी तूं झालासी । तुझीये उपकारासी काय वानुं ॥१६॥ भानुदासा नयनीं पुर्ण जळें दाटलें । मग आलिंगिलें पांडुरंगें ॥११७॥